
राज्यात आधी दुष्काळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे ऊस चक्क सपक झाला आहे. उसातील गोडवाच कमी झाल्याने साखरेचा उतारा कमालीचा घटला आहे. मागील वर्षी सुमारे सव्वाअकरा टक्के असलेला उतारा चालू हंगामात साडेदहा टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. सरासरीपेक्षा कमी साखरेचे उत्पादन होत असल्याने त्याचा मोठा फटका कारखान्यांना बसला आहे.
सध्या सुमारे 143 साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. दुष्काळामुळे आधीच उसाचे क्षेत्र घटलेले असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यात आलेल्या पुरामुळे ऊस पिकाचे नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अपुऱया उसावर अनेक कारखान्यांचे कसबसे गाळप सुरू आहे. त्यानंतर आता गाळपासाठी आलेल्या उसात साखरेचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी एक टन उसाचे गाळप केल्यानंतर सुमारे 115 ते 120 किलो साखर तयार होत होती, मात्र सध्या साखरेचा उतारा कमी झाल्याने प्रतिटन ऊस गाळपामागे 105 किलो एवढी साखर तयार होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या एकूण साखर उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिह्यात 12.39 टक्के एवढा साखरेचा उतारा होता. त्यामध्ये घट होऊन साडेअकरा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
विभाग चालू वर्षाचा उतारा मागील वर्षीचा उतारा
- कोल्हापूर 11.50 टक्के 12.39 टक्के
- पुणे 10.87 टक्के 11.62 टक्के
- सोलापूर 9.59 टक्के 10.23 टक्के
- नगर 9.94 टक्के 11.06 टक्के
- संभाजीनगर 9.57 टक्के 10.50 टक्के
- नांदेड 10.40 टक्के 11.24 टक्के
- अमरावती 10.01 टक्के 10.30 टक्के
- नागपूर 9.40 टक्के 10.78 टक्के






























































