
ठाणेकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भातसा धरणातून 50 दशलक्ष लिटर्स, मुंबईच्या कोटय़ातील प्रक्रिया केलेले 20 दशलक्ष लिटर्स व दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर्स असे 76.5 दशलक्ष लिटर्स असा अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिका ठाण्याला दररोज सुमारे 120 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करीत आहे. त्यात याअतिरिक्त पाणीपुरवठय़ाची भर पडल्याने ऐन पाणीटंचाईत मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची भीती आहे.
या निर्णयामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे साडेचार हजार एमएलडी इतकी आहे, पण सध्या मुंबईला सुमारे 3 हजार 850 एमएलडी पाणीपुरवठा होतो. मुंबईची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ठाणेकरांसाठी मुंबईच्या कोटय़ातील पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे मुंबईकरांचे 76.5 एमएलडी ठाण्याच्या वाटय़ाला जाणार आहे.
वास्तविक भातसा हे धरण राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. या धरणाचे उद्घाटन 1967 मध्ये झाले. तेव्हा भातसा धरण बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला 207 कोटी रुपयांचा निधी दिला होता. सध्याच्या घडीला या धरणातून मुंबईला दररोज 1 हजार 850 एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यासाठी महापालिका दरवर्षी राज्य सरकाराला 79 कोटी 50 लाख रुपये देत आहे. या धरणातील पाणी पिण्यासाठी तसेच सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठीही वापरले जात आहे. मुंबईला सुमारे 50 टक्के पाणीपुरवठा भातसा धरणातून होत आहे, उर्वरित मोडक सागर, मध्य वैतरणा व अन्य तलावांतून होतो, आता भातसा धरणातील 50 एमएलडी पाणी ठाणे पालिकेला देण्याचा निर्णयाचा त्रास मुंबईकरांना होणार आहे.
1 हजार एमएलडी पाणी शुद्धीकरणासाठी 14 ते 16 रुपये खर्च
मुंबई महापालिका आजच्या घडीला ठाणे व भिवंडीला दररोज सुमारे 120 एमएलडी पाणीपुरवठा करीत आहे. त्यात तब्बल 76.5 एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. त्याशिवाय या पाणी शुद्धीकरणाचा खर्च मुंबईकरांच्या माथी पडणार आहे. सध्याच्या घडीला एक हजार एमएलडी पाणी शुद्धीकरणाचा खर्च सरासरी 14 ते 16 रुपये येतो. ठाणेकरांच्या पाण्यासाठी मुंबईकरांनी हा खर्च का उचलावा, असा प्रश्न विचारला जात आहे.



























































