100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल, सर्व विभागांमध्ये एकच लगबग

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडय़ाचा उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 48 विभागांना 100 दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाज सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आखून दिले होते. आता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत हा निकाल जाहीर होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेतला आणि प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा दिला आहे. सरकारी विभागांनी गेल्या 100 दिवसांत केलेल्या सुधारणा कार्यक्रमांचे मूल्यांकन क्वालिटी काउंसील ऑफ इंडिया या केंद्रीय संस्थेकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारचे मूल्यांकन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या संस्थेने विभाग तसेच अधिकारी यांचेही मूल्यांकन केले आहे. या निकालात अव्वल ठरणाऱया विभाग आणि अधिकाऱयांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱया विभागांची नकारात्मक दखल घेतली जाणार आहे.

प्रभावी कार्यवाहीसाठीचे मुद्दे

100 दिवसाच्या आराखडय़ानुसार प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विभागाची वेबसाईट, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी आणि सुविधा, गुंतवणूक प्रसार, कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱयांना प्रशिक्षण, ई-ऑफिसचा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी मुद्दे ठरवून देण्यात आले आहेत.