राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे नवी दिल्ली येथे केली. प्रधानमंत्र्यांनीही राज्याच्या या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती देतानाच त्याबाबत राज्य सरकारने विविध पातळ्यांवर केलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांना अवगत केले. या परिस्थितीवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यास तातडीने मदत करावी अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिले. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केंद्राकडे 7 हजार 962 कोटी 63 लाखांच्या मदतीची यापूर्वीच मागणी केली असून ही मदत लवकर मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या भेटीदरम्यान, धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन प्राप्त करण्याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्र्यांनी या दोन्ही विषयांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.