
‘खेलो इंडिया’ युथ गेम 2021 स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राने मल्लखांब व ज्युडोमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. जलतरणात महाराष्ट्राचा काहीसा सूर हरवला. रिले आणि वैयक्तिक प्रकारात बहुतांशी जलतरणपटूंची एक-दोन सेकंदांच्या फरकामुळे पदकांनी हुलकावणी दिली. आन्या वालाने रौप्यपदक पटकावले. तिलाही एका सेकंदाचा फटका बसला. अन्यथा या प्रकारातीलही सुवर्णपदक तिचेच होते.
मल्लखांबच्या खेळाडूंनी केलेल्या चित्तथराक कसरतीमुळे सांघिक सुवर्णपदक मिळाले. 40 किलो वजनी गटात मिथिला भोसलेने महाराष्ट्राला ज्युडोमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. मुलांच्या मल्लखांब संघामध्ये अवधूत पिंगळे (मुंबई), ऋषभ गुगळे (मुंबई), अथर्व कोंडविलकर (मुंबई), चेतन मानकर (नाशिक), मुग्रान पाठारे (मुंबई), अमेय सूर्यवंशी (पुणे) यांचा समावेश होता.
खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी हरयाणाच्या संघाचा डावाने पराभव केला. बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजन गटात आर्या बारटक्के (सातारा) हिने हिमाचल प्रदेशच्या योगिता वर्माचा पराभव केला. तनिष्का पाटीलने (ठाणे) सिक्कीमच्या पेमा भुतिया हिला 5 विरुद्ध 0 अशा गुणांनी हरवले.
ठाण्याच्या मिथिलाची ज्युडोत ‘सुवर्ण’ कामगिरी
शुक्रवारी महाराष्ट्राला दुसरे सुवर्ण पदक ज्युडोमध्ये मिळाले. 40 किलो वजन गटात मिथिला भोसले हिने ही सुवर्ण कामगिरी केली. ती मूळ ठाण्याची असून सध्या बालेवाडी येथे ज्युडो अकादमीत सराव करते. तिने गुजरातच्या अर्चना नागेरा हिच्यावर विजय मिळवला. मिथिलाच्या या यशाचे राज्यभरातून मोठे कौतुक होत आहे.



























































