
घर खरेदीदार आणि विकासकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी महारेराने फेब्रुवारीपासून सुरू केलेली समुपदेशन व्यवस्था या दोन्ही घटकांना लाभदायक ठरली आहे. दरमहा सुमारे 300 ते 350 गरजू या सेवेचा लाभ घेत आहेत.
घर खरेदीदारांसमोर घराची नोंदणी केल्यानंतर त्यात निर्माण होणारे काही प्रश्न असू शकतात तसेच विकासकांच्या समोरही विनियामक आणि अनुषंगिक प्रश्नांबाबत समस्या असू शकतात. हे लक्षात घेऊन महारेराने फेब्रुवारीपासून ही व्यवस्था कार्यान्वित केली. बीकेसी भागात महारेराच्या मुख्यालयात चौथ्या मजल्यावर महारेराच्या कार्यपद्धतीबाबत समग्र माहिती असलेले दोन ज्येष्ठ अधिकारी कार्यालयीन वेळेत सातत्याने उपलब्ध असतात आणि मार्गदर्शन करीत असतात. घर नोंदणीनंतर ठरलेल्या कालावधीत ताबा मिळाला नाही. घराची गुणवत्ता बरोबर नाही, प्रकल्प होण्यात अडचणी आहेत याबाबत काय करायचे ? महारेराकडे याबाबत कशी दाद मागायची, त्यासाठी अर्ज कसा करायचा असे प्रश्न घेऊन अनेक घर खरेदीदार येत असतात. महारेराकडूनच मार्गदर्शन मिळत असल्याने ग्राहक समाधानी होत आहेत.


























































