
>> प्रा. किसन सुंगडे
महात्मा बसवेश्वर हे खऱ्या अर्थाने धार्मिक प्रसारक होते. त्यांचे विवेचन तर्कशुद्ध आहे. त्यांनी समाजाची नव्याने जडणघडण करण्यासाठी अनुभव मंडप नावाचे खुले व्यासपीठ निर्माण केले. बुद्धीच्या आधारावर सभासदांची निवड करण्यात येत असे. बसवेश्वरांचे अनुभव मंडप हे व्यासपीठ सामाजिक, अध्यात्मिक, व्यावहारिक, वैज्ञानिक स्वरूपातून सामाजिक प्रयोगशाळा होती. या माध्यमाद्वारे बसवेश्वरांनी समता, दयाप्रेम, श्रमप्रतिष्ठा, मानव कल्याणाचा पुरस्कार केला. बाराव्या शतकात समतेचा पुरस्कार करणारे बसवेश्वर परिवर्तनाचे कृतिशील धर्मप्रसारक ठरतात. यातच त्यांचे मोठेपण समावले आहे.
समतावाद व एकेश्वरवादाचे आद्यप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांची मंगळवार, 7 मे रोजी जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा बसवेश्वरांचे अवतारकार्य समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाधिष्ठीत समाजव्यवस्थेसाठी परस्परपूरक आहे. त्यांनी बाराव्या शतकात समाजव्यवस्थेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे, जे आजही दिशादर्शक ठरणारे आहे. समाजात एकोपा रहावा, कष्टाच्या आधारे उपजीविका करताना जीवमात्रांची हिंसा व हत्या करू नये, सदाचारांचा गुण अंगीकारावा, स्त्रियांचे स्वावलंबन पर्यावरणपुरक विकास साधने यावरही त्यांनी भर दिला. त्यांच्या जीवनचरित्राचे विविध पैलू आहेत. म्हणूनच ते जगत्ज्योती आहेत तसेच ते समाजाचे आधारवडही आहेत.
अनिष्ट रुढी-परंपरांमध्ये गुरफटलेल्या समाजाला समातावादाच्या विचारसरणीप्रमाणे वाटचाल करण्यास्तव जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची प्रस्थापना केली. समता, स्वातंत्र्य, न्यायाधिष्ठीत समाजाची जडणघडण करताना त्यांनी मानवतावादाला स्थान देत एकेश्वरवाद रुजवला. उपास्य दैवत म्हणून भगवान शंकराला प्राधान्य दिले. त्यातूनच इष्टलिंग पूजेचे महत्त्व पटवून दिले. अहिंसा, श्रमप्रतिष्ठा व सर्वांचा सन्मान जपण्यावर बसवेश्वरांनी भर दिला. त्यामुळेच ते युगप्रवर्तक बहुजनांचे कैवारी ठरले.
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतिया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतियेच्या दिवशी 1106 (शके 1029) मध्ये इंगलेश्वर (जि. विजापूर, कर्नाटक) येथे झाला. त्यांच्या जन्माअगोदर माता-पित्यास नंदीकेश्वरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांचे नाव ‘बसव’ असे ठेवण्यात आले. वयाच्या आठव्या वर्षीच बसवेश्वर यांना सामाजिक परिस्थितीचे ज्ञान झाले. यातूनच ते घर सोडून थेट कुडल संगमेश्वराच्या दर्शनाला गेले. तेथेच श्रीजात वेद मुनी शिवाचार्य यांचे शिष्यत्व पत्करून वीरशैव धर्माच्या तत्त्वाची ओळख करून घेतली. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करताना धर्मशास्त्र आणि प्रत्यक्ष व्यवहारातील तफावतींची जाणीव बसवेश्वरांना झाली. याच जाणिवेतून बसवेश्वरांनी परिस्थिती बदलण्यासाठी अनिष्ट बाबी दूर करण्याचा विडा उचलला. यासाठी प्रथम त्यांनी समविचारी तरुणांचे संघटन केले. सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर कठीण धर्मशास्त्र समाजासमोर मांडण्याऐवजी जनतेला कानडी भाषेतून सोप्या भाषेत भक्ती मार्गाचा उपदेश करण्यासाठी सक्रिय झाले. चोरी करू नये, खोटे बोलू नये, हिंसा करू नये, स्त्रियांना समान वागणूक द्या, आपण सर्वजण शिवाची लेकरे, त्यामुळे शिवभक्तांना समान वागणूक द्या, कर्म करावे, कुणासमोर हात पसरू नका असा विचारच समाजासमोर ठेवला. त्यांचा हा विचारच ‘कायक के कैलास’ या नावाने प्रसिद्ध झाला.
श्रमप्रतिष्ठेला प्राधान्य
बसवेश्वरांचे अवतारकार्य बाराव्या शतकातील असून, समाजातील अराजक व मरगळ दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत बनला पाहिजे. कारण सदाचाराने पृथ्वीचा स्वर्ग होतो. अनाचारातून नरक बनतो. सदाचाराद्वारे अनाचार हद्दपार करता येऊ शकतो. यात महत्त्वाचे म्हणजे जिणे लाजिरवाणे होऊ नये, स्वातंत्र्य व आत्मसन्मान कायम रहावा म्हणून ‘कायक वे कैलास’ सिद्धांताची बसवेश्वरांनी मांडणी केली. या सिद्धांतामध्ये पाच तत्त्वांचा बसवेश्वरांनी कल्पकपणे विचार केला. त्यात शरीरश्रम, बौद्धिकश्रम, पैसा गुंतवणूक, सेवा आणि शुभ चिंतन अथवा आशीर्वाद (उपदेश) या पाच तत्त्वांना प्राधान्य दिले. कर्म, क्रिया हा सजिवाचा सर्वोच्च गुणधर्म आहे. जगाचे अस्तित्त्व क्रिया, कर्मावर आधारलेले आहे. म्हणूनच क्रिया थांबली की जग शून्य ठरते! श्रम हाच स्वर्ग आहे. हिच मुळी समस्त मानवाचा गुणधर्म असल्याचा मौलिक विचार बसवेश्वरांनी जगाला दिला. कायक सिद्धांत पाळताना पैशामुळे तफावत निर्माण होण्याचा धोकाही बसवेश्वरांना माहीत होता. गरजेपेक्षा जास्त पैशातूनच श्रीमंत- गरीब असा विरोधाभास निर्माण होतो. पैशामुळे व्यवस्थेत बाधा होऊ नये या हेतूने ‘दासोद’ हा विचार मांडला. दैवाने दिले असेल तर दैवाला अर्पण झाले पाहिजे. यातच निरहंकारी भावना जपणे आवश्यक आहे. ‘दासोद’ द्वारे असमर्थ व्यक्तीच्या पालनपोषणाची सोय व्हावी असा मनोदय बसवेश्वरांनी व्यापक दृष्टीने केला आहे.
वीरशैव विश्वधर्म
वीरशैव समाजामध्ये आत्मा आणि परमात्मा स्वरूपात जी पूजा होते त्यास ‘अहंग्रोपासना’ असे म्हटले जाते. वीरशैवांना मूर्तीपूजा मान्य नाही. शिवसंस्कारामुळे वीरशैव नेहमीच शुद्ध असतो. त्यामुळे वैदिक कर्मकांडाचा भाग असणारी ‘पंचसुतके’ पाळण्याची गरज नाही. 16 संस्कारांप्रमाणे वीरशैव धर्मात ‘दशकर्म’ पद्धती आहे. त्यामुळे मातेच्या गर्भावस्थेत बालकास मातेमार्फत लिंग धारण केले जाते. बालकाच्या जन्मानंतर आठव्या वर्षी मुलांप्रमाणे मुलींना गुरू करून दीक्षा संस्कार, इष्टलिंगधारण आणि मंत्रोपदेश करविला जातो. विवाहाआधी मंगल कार्यात पंचाचार्याचे प्रतीक म्हणून पंच कलशाची स्थापना केली जाते. गुरूंच्या साक्षीने हे सर्व विधी पार पाडले जातात. त्यासाठी जंगम पुरोहिताची आवश्यकता असते. समाजातील मृताचे दहन केले जात नाही. देह देववेदेगुल (देवालय) असल्याने बसलेल्या स्थितीत समाधी संस्कार होतात. यालाच शिवैक्य किंवा लिंगैक्य होणे म्हणतात. समाजाला सर्व जग विश्वरूप भासते. त्यामुळे हा समाज विश्वधर्मच मानला जातो.
बसवेश्वरांची विचारसरणी व त्यांनी समाजासाठी घालून दिलेल्या तत्त्वाप्रमाणे वीरशैव धर्माची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. त्यांची विचारसरणी ही तंतोतंत लोकशाही मूल्यांशी निगडित आहे. म्हणूनच ते महान विश्वविभूती, विश्वज्योती व विश्वगुरू, स्त्री उद्धारक, मध्ययुगीन हिंदुस्थानचे जनक, पर्यावरणवादी आदी विशेषणांनी ओळखले जातात. त्यांचे चरित्र हे समाजाला नवी दिशा देणारे आहे.


























































