
विधानसभा अध्यक्षपदाची निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठविल्यानंतर आज मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन निवडणुकीला मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले. हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर सल्ला घेऊन अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात कळवू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात विनंती करण्यात आली. मात्र राज्यपालांकडून प्रतिसाद न आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवाहनमंत्री अनिल परब, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री सतेज पाटील या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
सकारात्मक चर्चा
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याची भूमिकासुद्धा सकारात्मक असल्यामुळे उत्तरही सकारात्मक येईल अशी अपेक्षा असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपालांना वाटेल त्या तारखेला निवडणूक घेऊ
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी 9 तारखेची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासाठी त्यांच्यावर दबाव आणलेला नाही. त्यांना जी तारीख वाटेल त्या तारखेला निवडणूक घेऊ असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये असा भाजपचा प्रयत्न
विधानसभा अध्यक्षपदाची निवड होऊ नये असा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे लोक हायकोर्टात गेले होते; परंतु कोर्टाने त्यांना फटकार लावली आहे. हायकोर्टात यायचे असेल तर पैसे भरा असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच विधान परिषदेचा निर्णय विधान परिषदेत करा असे हायकोर्टाच्या निर्णयात सांगण्यात आले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राज्यापालांच्या अभिभाषणाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
n राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 आमदारांच्या निवडीबाबतही विनंती करण्यात आली आहे. लोकशाहीत बहुमताच्या सरकारचे महत्त्व असते. लवकर न्याय देऊन विधान परिषदेच्या सभागृहात लोकांची सेवा आणि लोकांच्या प्रश्नाबाबत न्याय देण्याची संधी द्यावी अशी विनंती राज्यपालांना केली आहे.





























































