
विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केल्यानंतर आठ महिने उलटले. न्यायालयाने सांगितल्यानंतरही राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताच निर्णय न घेतल्याने 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना 1 सप्टेंबर रोजी भेटणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात दिली.
पुणे येथे राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या भेटीदरम्यान राज्यपालांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी विनंती केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असे सर्वपक्षीय नेत्यांचे मत आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
























































