
ग्रामीण राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना अस्मान दाखवले. मराठवाड्यात महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे. परभणी, लातूरात महाविकास आघाडीने वर्चस्व राखले. धाराशिवमध्ये आठ पैकी पाच बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. परंड्यात ‘क्रिएटर’ असलेल्या तानाजी सावंतांना मतदारांनी पळता भूई थोडी केली. बीडमध्ये भाजपची दाणादाण उडाली. येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे 40 वर्षांचे साम्राज्य धुळीला मिळवत महाविकास आघाडीचा झेंडा डौलाने फडकला. परळीत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना मतदारांनी पुन्हा झिडकारले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील बहुतांश कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. आज सकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची 40 वर्षांपासूनची एकहाती असलेल्या सत्तेचे इमले महाविकास आघाडीच्या ताकदीपुढे थिटे पडले. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने येथे दणदणीत विजय मिळवला. गेवराई, परळी तसेच अंबाजोगाईतही भाजपची मोठी पळापळ झाली. केजमध्ये रमेश आडसकर यांच्यामुळे भाजपची अब्रु वाचली. बीड बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागा महाविकास आघाडीच्या खात्यात आल्या. परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एकही जागा मिळवता आली नाही. येथील अठराही जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्या. अंबाजोगाईतही राष्ट्रवादीने 18 पैकी 15 जागा मिळवून भाजपची मक्तेदारी संपुष्टात आणली. केजमध्ये भाजपच्या आडसकर गटाला 11 जागा मिळाल्या. गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पॅनलने सगळ्या 18 जागा जिंकल्या.
धाराशिव जिल्ह्यातील आठ पैकी कळंब, परंडा, मुरुम तसेच उमरगा आणि वाशी या पाच बाजार समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या. धाराशिव, तुळजापूर आणि भूम समित्यांवर भाजपने ताबा मिळवला. नांदेड जिल्ह्यातील कुंटूर बाजार समितीत ऐनवेळी काँग्रेस आणि भाजपची आघाडी झाली होती. येथे भाजपचे 10 आणि काँग्रेसचे 7 सदस्य निवडून आले. भोकर येथे काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 जागा जिंकून वर्चस्व राखले. नव्यानेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बीआरएस पक्षाला मतदारांनी नाकारले. हिमायतनगर बाजारसमितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला. नायगाव बाजार समिती अगोदरच बिनविरोध झाली असून नांदेड बाजार समितीची मतमोजणी रविवारी होणार आहे.
हिंगोली बाजार समिती निवडणूकीत संत नामदेव शेतकरी विकास पॅनलचे 9 संचालक निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन संचालक निवडून आले आहेत. येथील एक जागा बिनविरोध निघाली होती. तसेच शेतकरी परिवर्तन विकास पॅनलचे 6 व अन्य दोघे असे 8 जण निवडून आले आहेत.
परभणी जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पूर्णा, सेलू येथे महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला. शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव, शिवसेना आमदार राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परभणीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. जिंतूरला आणि ताडकळस बाजार समितीमध्ये बोर्डीकर यांच्या पॅनलने बाजी मारली. पाथरी आणि पालमला उद्या रविवारी मतदान होणार आहे.
लातूर जिल्ह्यात आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांच्या कृषी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. चाकूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नंदकुमार पवार, दत्ता कलाले विजयी झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली. छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आणि कन्नड बाजार समितीत भाजप-शिंदे गटाला यश मिळाले. कन्नड बाजार समितीवर माजी आमदार नितीन पाटील आणि संजना जाधव यांच्या पॅनलने विजय मिळवला.






























































