कोल्हापूरात आज महाविकास आघाडीचे आंदोलन, महापुरुषांच्या अवमानाचा, कन्नडिगांच्या हैदोसाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून वेळोवेळी होणारी अवमानकारक वक्तव्ये, तसेच कर्नाटक सरकारकडून सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या (दि. 10) राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, सीमाभागातील तणावाचे कारण देत प्रशासनाच्या वतीने 23 डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह सीमाभागातील प्रमुख नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता या आंदोलनास सुरुवात होणार आहे. सीमाभागात सुरू असलेली सौंदत्ती यात्रा, तसेच श्री दत्तजयंतीनिमित्त सर्वत्र होत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होत आहे. यामध्ये सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, तसेच विजय देवणे यांनी केले आहे.

या, आम्ही भगवे घेऊन येतो! – विजय देवणे

‘‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तुम्ही तुमचा लाल-पिवळा झेंडा घेऊन या, आम्हीपण आमचे भगवे झेंडे घेऊन येतो. मग बघूया कोण शिल्लक राहते ते!’’ अशा आक्रमक भाषेत निपाणी नगरपालिकेवरील भगवा ध्वज काढण्याची भाषा करणाऱया कन्नड रक्षण वेदिकेच्या मग्रूर गुंडांसह संबंधित आरटीआय कार्यकर्त्याला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आव्हान दिले आहे. मराठी भाषिक सीमाभाग चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज काढण्याच्या प्रयत्नानंतर आता निपाणी नगरपालिकेवरील भगवा ध्वज काढण्यासाठी कन्नडिगांकडून मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्यात येऊ लागले आहे. यासंदर्भात बोलताना विजय देवणे यांनी हा इशारा दिला.