एवढं ‘निष्ठुर’ आणि ‘बधिर’ सरकार जनतेने पहिल्यांदाच पाहिलं, नाना पटोलेंचं टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर कृषी मंत्र्यांनी ज्याप्रमाणे उत्तर दिलं हेच या सरकारच्या बधिरतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ‘अशा आत्महत्या होतच राहतात’ असे कृषिमंत्री म्हणाले. त्यामुळे हे किती असंवेदनशील सरकार आहे याच हे उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं ‘निष्ठुर’ आणि ‘बधिर’ सरकार जनतेने पहिल्यांदाच पाहिलं असेल. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली आहे. विधीमंडळाचे कामकाज संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, ‘सरकारकडून अन्नदात्या शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनीही शेतकऱ्यांबद्दल अनेकदा चुकीची वक्तव्ये केली आहेत. राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे याच दुसरं प्रमाण देण्याचं गरज नाही. अजूनही शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही.”

“सरकारला आता प्रशासकीय व्यवस्था संपुष्टात आणायची आहे. अशा पद्धतीचे त्यांचे सरकारी आदेश येत आहेत. एमपीएससी परीक्षा या जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे घ्या अशी मागणी आम्ही केली, मात्र सरकारने यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. मी गेली 25 वर्षे सभागृहाचं कामकाज पाहत आहे. मात्र असं सरकार मी कधीच पाहिलं नाही. कोणता विषय कोणाच्या खात्याचा हेच या मंत्र्यांना माहित नाही. त्यामुळे या सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याच काम केलं आहे.” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

“ओबीसींच्या नवे मत मागायची आणि ओबीसींनाच लुटायचं हा भाजपचा अजेंडा पुढे येत आहे. त्यामुळे आता ओबीसी भाजपला मतदान करणार नाहीत.” असाही यावेळी नाना पटोले म्हणाले.