केंद्राच्या कृषी कायद्यांना महाविकास आघाडीचा विरोधच; नवाब मलिक यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा कालही विरोध होता,  आजही आहे आणि उद्याही राहील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.

केंद्रीय कृषी कायद्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीची भूमिका नवाब मलिक यांनी स्पष्ट केली.केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमांतून उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे असे ते म्हणाले.

विरोध कायमच

आमच्या सरकारचा व आमच्या पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तिन्ही कृषी कायद्यांना कायम विरोध आहे याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला.

शेतकऱयांशी चर्चा

विधानसभेत कृषी केंद्रीय कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव मंजूर करण्याचे काम सरकारकडून होणार आहे. त्या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करेल. त्यानंतर ती समिती शेतकऱयांच्या नेत्यांशी चर्चा करील. नंतर मसुदा तयार करून पुढे कसे जायचे ते ठरवण्यात येईल. जोपर्यंत शेतकऱयांना तो मसुदा मान्य होत नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.