
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने ‘लाडक्या बहिणीं’ना देण्यासाठी सरकारकडे निधी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मुंबई भेटीवर आलेल्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे महायुती सरकारने पदर पसरला आहे. सरकारकडे पैसा नाही, पण तरीही आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना खूष करण्यासाठी या सर्वांची हॉटेल ट्रायडंटमध्ये शाही बडदास्त ठेवली आहे. शाही मेजवानी, वायनगरीची ट्रिप, शिर्डी दर्शन, सांस्पृतिक कार्यक्रमांची रेलचेल असा भरगच्च कार्यक्रम आहे.
कर महसुलातील केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा निश्चित करणे, राज्यांना दिली जाणारी आर्थिक मदत, अनुदान यासंदर्भात पेंद्राला धोरणात्मक शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने 2026 ते 2031 अशा पाच वर्षांसाठी 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला 31 ऑक्टोबर 2025पूर्वी आपल्या शिफारशी केंद्राला सादर करायच्या आहेत. अरविंद पनागरिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाचे सदस्य अजय झा, मॅथ्यू, मनोज पांडा आणि ऋत्विक पांडे यांचे बुधवारी मुंबईत आगमन झाले. उद्या (गुरुवारी) सह्याद्री अतिथीगृह येथे वित्त आयोगाची दिवसभर बैठक चालणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार हे राज्य सरकारच्या मागण्या आयोगासमोर ठेवणार आहेत. या वेळी आयोगासमोर राज्याच्या आर्थिक स्थितीचे सादरीकरण केले जाईल. तसेच पंधराव्या वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला किती निधी मिळाला आणि तो कोणत्या योजनांवर खर्च झाला याची माहिती आयोगाला दिली जाईल.
पंचतारांकित बडदास्त
मुंबईत बैठकीसाठी आलेल्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची राज्य सरकारने खास बडदास्त ठेवली आहे. या सर्वांचा मुक्काम मंत्रालयाशेजारील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. उद्या दिवसभरच्या बैठका आणि भेटीगाठींच्या सत्रानंतर वित्त आयोगासाठी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये महाराष्ट्राच्या सांस्पृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वायनरी आणि धार्मिक भेटही
शुक्रवारी वित्त आयोग नाशिकला भेट देणार आहे. 2027मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत नाशिक महापालिका आयोगाला सादरीकरण करणार आहे. नाशिकच्या एक दिवसाच्या दौऱ्यात आयोग त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी आणि वायनरीला भेट देणार आहे. त्यानंतर आयोगाचा शिर्डी दौरा आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन आयोग नवी दिल्लीला रवाना होईल.