कवडसे – दूर दूर जाताना…

>>महेंद्र पाटील

एखाद्या सुंदर संध्याकाळी समुद्रकिनारी उसळणाऱया लाटांकडे पाहत रममाण होऊन जाणारे आपण त्यात हरवून जायचो. तेव्हा एकमेकांच्या डोळ्यांत पाहात, हातात हात घेऊन चालत जायचो, दूरवर निसरडय़ा रस्त्यांवरून आणि उद्याची स्वप्नं पाहात पुन्हा दूर व्हायचो. घरी जाताना नव्याने पुन्हा भेटण्याचे विचार मनात घोळत असायचे. पण उद्यापासून हे सगळं विरून जाणार. या सांजवेडय़ा भेटी त्यानंतर वाटणारी आंतरिक ओढ मनातल्या विचारांचे आपापसातलं बोलणं सगळंच एका वळणावर येऊन थांबलंय आता.

 तुला दूर जाऊ नको, असं सांगतानाही मनात बऱयाच विचारांचा घोळ सुरू आहे. तुला थांबवावं असं मनापासून वाटतंय, पण कितीतरी दिवस हा प्रश्न आहे तिथेच राहिलाय. ऋतूमागून ऋतू बदलत गेले, पण मीही एकाच जागी थांबलोय. शिशिरातील पानगळ संपून आपल्याही आयुष्यात वसंत बहरेल या आशेवर जगतोय. हा वसंत तुझ्यासोबत जगायचा आहे, अनुभवायचा आहे. खूप दूर जायचं आहे. क्षितिजाच्याही पल्याड… तुझ्या-माझ्या  स्वप्नांच्या गावी… पण सगळे विचार मनातल्या मनातच राहिले आहेत. कारण यावेळीही नियती माझ्यावर रुसून बसली आहे नेहमीप्रमाणेच. अगदी जन्मोजन्मीची वैरीण असल्यासारखी वागते ती माझ्याशी. तिला माझ्या मनातल्या क्षितिजापर्यंत तुला पोहोचू द्यायचं नाहीये. ते केवळ माझ्या मनातच आहे. जाण्याची ओढ खूप आहे, तीही तुझ्यासोबत, पण आता त्याही आशा धूसर होऊ लागल्या आहेत. सांज जशी मावळते तशी माझ्या अंतरी खूप हुरहुर वाटू लागते. सतत तुझा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि  तुझ्या सगळ्या आठवणी  माझ्या भोवताली  गर्दी करतात…थांब, अशीच जाऊ नको, साठवून घेऊ दे मला हा क्षण, ही संध्याकाळ. बघ, तुझं हसणं मला आता रडवू लागलं आहे. येणारी रात्र क्रूर थट्टा करतेय माझ्या सोबत. दूर ओढून नेत आहे तुला माझ्यापासून, कायमची. उद्या येणाऱया पहाटेला मी सांगू शकणार नाही की, तू माझी आहेस आणि तसं स्वप्नातही पाहू शकणार नाही.

एखाद्या सुंदर संध्याकाळी समुद्रकिनारी उसळणाऱया लाटांकडे पाहत रममाण होऊन जाणारे आपण त्यात हरवून जायचो. तेव्हा एकमेकांच्या डोळ्यांत पाहात, हातात हात घेऊन चालत जायचो, दूरवर निसरडय़ा रस्त्यांवरून आणि उद्याची स्वप्नं पाहात पुन्हा दूर व्हायचो. घरी जाताना नव्याने पुन्हा भेटण्याचे विचार मनात घोळत असायचे. पण उद्यापासून हे सगळं विरून जाणार. या सांजवेडय़ा भेटी त्यानंतर वाटणारी आंतरिक ओढ मनातल्या विचारांचे आपापसातलं बोलणं सगळंच एका वळणावर येऊन थांबलंय आता. यापुढचा प्रवास मला एकटय़ाने करण्यासाठी तिथेच सोडून गेले ते दिवस.

तिथून पुन्हा मी मावळणाऱया सूर्याकडे पाहत बसलोय, एकाकी एकटाच आणि शोधतोय मलाच मी. कसा शोधू मला मी? हा प्रश्न पडलाय मला आता. कारण तुला समजून घेताना मीच कुठेतरी हरवत गेलो दूरवर. आता पुन्हा शोध घ्यायचा म्हटलं तर जुने बंध पुन्हा उसवावे लागतील. तुझ्या माझ्या नात्याची वीण कशी आणि कुठे बांधली गेली त्या वळणापर्यंतचा प्रवास पुन्हा मला करावा लागणार आणि तोही एकटय़ानेच. खूप कठीण असतं गं ते…ज्या वळणावर आपण भेटलो तिथेच जाऊन आठवणींच्या उसवणीला पुन्हा सुरुवात करायची. ती करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तेव्हा जाणीव होऊ लागली की, एक वेळ अंगावरची त्वचा उसवताना होत नसेल इतका त्रास आठवणींची उसवण करताना होतो. आपण पार केलेल्या एकेका वळणावर जाऊन एकेका आठवणीतून माझी सुटका करून घेत असतो. मात्र बांधला जात असतो नव्या आठवणींमध्ये. नव्या त्रासाच्या, एकलेपणाच्या आठवणी ताबा घेतात माझ्या मनाचा आणि पुन्हा बांधून टाकतात मलाच या आठवणींच्या विळख्यात. मग पुन्हा हरवत जातो मी स्वतःलाच शोधायला.

[email protected]