मी स्वत:ची टीम सुरू करतोय! धोनीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 17 वा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. अखेरचे दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत, मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपलाय. त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यापासून महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र धोनीने फेसबुकवर पोस्ट केल्याने त्याच्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

धोनीची फेसबुकवर पोस्ट लागलीच वाऱ्यासारखी व्हायरल झाली. धोनी आपल्या पोस्टमध्ये नव्या टीमबाबत बोलत आहे. तो पोस्टमध्ये म्हणतोय की, ‘योग्य निर्णय घेण्याची वेळ. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वतःची टीम सुरू करत आहे.’ धोनीच्या या पोस्टचा अर्थ काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. धोनी स्वतःची आयपीएल टीम सुरू करणार आहे का? तो कोचिंगमध्ये करिअर सुरू करणार आहे? याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या पोस्टनंतर वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत, पण अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.