
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्य शासनाचा यंदाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे तर ‘श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन’ पुरस्कारासाठी साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशन संस्थेची निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा प्रसार आणि प्रचार करणाऱया महनीय व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी गौरविण्यात येते. साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
यंदाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना तर मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषा गौरवदिनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
























































