मिंधेंचा खरा चेहरा उघड; द्वारलीतील ‘त्या’ जागेत घुसखोरी प्रकरणी महेश गायकवाडवर गुन्हा

द्वारली गावातील जमीन व्यवहाराच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. मात्र ज्या वादग्रस्त जागेवरून हा वाद झाला त्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याप्रकरणी महेश गायकवाडवर हल्ल्याच्या एक दिवस आधी हिललाईन पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता, अशी नवीन माहिती समोर आली आहे.

त्यामुळे गोळीबार प्रकरणात नवे ट्विस्ट निर्माण झाले आहे. वादग्रस्त जागा हेरायच्या मग गुंडाना सोबत घेऊन त्या जागांवर कब्जा करायचा आणि नंतर सत्तेचा दबाव टाकून पोलिसांच्या मध्यस्थीने मांडवली करायची अशी पद्धत गेल्या वर्ष, दीड वर्षापासून कल्याण, डोंबिवलीत सुरू आहे. मात्र गणपत गायकवाड मांडवलीला तयार नसल्यानेच हा रक्तरंजित प्रकार घडला आणि यातून मिंधेंचा खरा चेहराही समोर आला.

द्वारली गावातील पाच एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन आपली असून शेतकऱयांचा गैरसमज करून महेश गायकवाड त्रास देत असल्याची तक्रार गणपत गायकवाड यांची आहे. टॅक्स स्काय व्हिला बांधकाम कंपनीचे संचालक जितेंद्र पारीक तसेच फेअरडील डेव्हलपर्स संस्थेचे प्रमोद रंका यांचे द्वारली येथे भागीदारी पद्धतीने जमीन व गृहप्रकल्प विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे. खरेदी विक्री व्यवहाराने ही जमीन भागीदारांनी कब्जात घेतली आहे. असे असताना 31 जानेवारी तसेच 2 फेब्रुवारी रोजी या जागेत महेश गायकवाड, राहुल पाटील, एकनाथ जाधव, किरण फुलोरे, सुनील जाधव, अक्षय गायकवाड यांसह 60 ते 70 जणांनी या जागेत बेकायदा घुसून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगारांना दमदाटी, शिवीगाळ करून काम बंद पाडले. तसेच बांधकामाच्या ठिकाणचे लोखंडी खांब व संरक्षित भिंत म्हणून लावलेले पत्रे उखडून फेकून दिले. याप्रकरणी जितेंद्र पारीख यांच्या तक्रारीवरून महेश गायकवाडसह असंख्य जणांवर बेकायदा जमाव जमवून जागेत घुसखोरी केल्याबद्दल हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये समेट घडवण्यासाठी पोलीस ठाण्यात बैठक सुरू असतानाच गोळीबार झाला.

‘खोक्यां’साठीच ‘गन’वॉर

होऊ घातलेले विविध प्रकल्प आणि पायाभूत सुविधांमुळे कल्याण, डोंबिवलीतील मोकळ्या जागांना सोन्याचा भाव आला आहे. या हव्यासापोटी भाजप आणि मिंधे गटाच्या बाहुबली राजकारण्यांनी गरीबांना देशोधडीला लावले आहे. दमदाटी आणि किरकोळ पैसे देऊन कल्याण, डोंबिवली शहराच्या भोवताली असणाऱया जमिनी बळकावण्याचा एक कलमी उद्योग सुरू आहे. यातूनच आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड सोबत शे-दीडशे गुंडांची फौज घेऊन फिरत असतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र महेश गायकवाड आपल्याला अधिक त्रास देऊ लागल्याची खदखद गणपत गायकवाड यांना होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगूनही ते मिंधेंचा बंदोबस्त करत नसल्याने ‘खोक्यां’मध्ये वाटणी नको यासाठीच हे ‘गन’ वॉर झाल्याची चर्चा आहे.

आठ सीसीटीव्ही फुटेज, 16 पेन ड्राईव्ह ताब्यात
z हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तुफान गोळीबार केल्यानंतर काही तासांतच त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. क्राईम ब्रँचच्या टीमने त्याची गंभीर दखल घेत आज पोलीस ठाण्यातील आठ सीसीटीव्ही फुटेज व 16 पेन ड्राईव्ह ताब्यात घेतले. त्याची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे क्राईम ब्रँचचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले. दरम्यान हा फिल्मी स्टाईल थरार घडला तेव्हा तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाबही पोलिसांनी नोंदवले आहेत.

z ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने द्वारली गावातील वादग्रस्त जागेला आज भेट दिली. गणपत गायकवाड यांच्यावरील अॅट्रॉसिटी आणि महेश गायकवाडवरील घुसखोरीच्या गुह्याशी संबंधित तक्रारदारांचे जबाब घेतले.
z कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या गणपत गायकवाड यांना घरचे जेवण नाकारले. जेवणाऐवजी ज्यूस देण्याची त्यांनी मागणी केल्याची माहिती.

n आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव याच्यावरही गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकाचा पुणे, कोकण आणि सीमावर्ती भागात शोध.
n गोळीबारात जखमी झालेला महेश गायकवाड 48 तासांनंतर शुद्धीवर. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ज्युपिटर हॉस्पिटलने दिली.