
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे अँड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे नुकतेच चंद्रपूरच्या वरोरा येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हय़ाचा आधारस्तंभ गमावल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय परिस्थितीवर पोटतिडकीने बोलणारे टेमुर्डे यांना सामाजिक भान होते. त्यामुळे ते राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही पुढे असायचे. ग्रामीण भागात काम करीत असताना मोरेश्वर टेमुर्डे यांनी अनेक संस्थांची स्थापना केली.
दरम्यान, मोरेश्वर टेमुर्डे यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले. ते 1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 असे दोन वेळा आमदार हाते. त्यांनी या दोन्ही निवडणुका शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून लढल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
टेमुर्डे यांनी 1991 ते 1995 च्या दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे चंद्रपूर जिह्यातील निकटवर्तीय म्हणून अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिह्यातील उभारणीत टेमुर्डे यांचा मोठा वाटा होता. सडेतोड बोलणाऱ्यांपैकी अॅड. टेमुर्डे हे होते. नुकतेच त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी देऊ नये असे कळविले होते. हे पत्र चांगलेच गाजले होते. टेमुर्डे यांचा राजकीय जीवनाचा प्रवास युवक काँग्रेसपासून पुढे शेतकरी संघटना, जनता पक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिवापर्यंतचा असला तरी अखेरपर्यंत त्यांची ओळख शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून होती.
1968 पासून वकिली व्यवसायाने सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगळ्या वाटेवर आला. अन्नदाता सुखी झाल्याशिवाय प्रगतीच्या योजना गप्पा ठरतात ही खूणगाठ बांधून ते 1984 पासून शेतकरी संघटनेत काम करू लागले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यात त्यांना कारावासही झाला. मोरेश्वर टेमुर्डे चंद्रपूर जिल्हय़ातील राजकारणातले अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्हय़ाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गासाठी लढणारा एक लढवय्या आम्ही गमावला अशा भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.
माजी आमदार टेमुर्डे यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला दान करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वीही त्यांनी सामाजिक भान जपले. लढवय्या नेत्याला सलाम!
>> महेश उपदेव