राजस्थानातील हेरॉईनचा मुख्य सप्लायर गजाआड, तीन कोटींच्या ड्रग्जसह रंगेहाथ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानात बसून मुंबईत हेरॉईनचा सप्लाय करणारा मुख्य सप्लायर अखेर फसला. अमली पदार्थविरोधी पथकाने पद्धतशीरपणे मुख्य सप्लायर प्यारे खान (64) याला मुंबईत येण्यास भाग पाडून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

गेल्या जुलै महिन्यात वरळी युनिटने एका पेडलरला पकडून अडीचशे ग्रॅम हेरॉईन साठा पकडला होता. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकांनी मुंबईत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या 13 जणांना पकडले होते. 13 जणांची साखळी तोडल्यानंतर या तस्करांना हेरॉईन ड्रग्ज उपलब्ध करून देणारा राजस्थानचा प्यारे खान हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी एका पेडलरला हाताशी धरून मुंबईत न येता राजस्थानातून हेरॉईनचा सप्लाय करणाऱ्या प्यारे खानला मुंबईत यायला प्रयत्न सुरू केला. दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर प्यारेला मुंबईत आणण्यात पोलिसांना यश आले. मुंबईत येताना प्यारे तब्बल एक किलो हेरॉईनचा साठा घेऊन आला. प्यारेला बोरिवलीला हेरॉईनचा साठा देण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानुसार आझाद मैदान युनिटच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचून प्यारे खानला तीन कोटी किमतीच्या हेरॉईन ड्रग्जसह पकडले. प्यारे राजस्थानात बसून बस अथवा रेल्वेतून हेरॉईनचे पार्सल पॅरियरच्या माध्यामातून मुंबईत पाठवायचा.

अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत गेल्या सहा महिन्यांत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या 14 जणांना पकडून तब्बल 44 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. प्यारे खानलाच गजाआड केल्याने हेरॉईनची तस्करी करणाऱ्या पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.