माजलगावात राजकारण पेटले; सोळुंके-जगताप यांच्यात जुगलबंदी

majalgaon-politics-solunke-jagtap

उदय जोशी । बीड

विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असताना माजलगावचे मैदान आताच तापले आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत समोरासमोर येणारे माजी मंत्री प्रकाश सोळुंके आणि छत्रपती कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांच्यातील राजकीय जुगलबंदी रंगात येत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना जगताप सोळुंकेची ‘नौटंकी’ दाखवत आहेत. तर सोळुंके जगतापाची ‘औकात’ – लायकी दाखवण्याची भाषा वापरत आहेत. या वादावरून आगामी निवडणुकीत मोठी लढत माजलगावमध्ये पाहण्यास मिळणार आहे.

ऊस उत्पादक मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या या मतदार संघात तीन साखर कारखाने आहेत. यातील एक कारखाना प्रकाश सोळुंके यांच्या तर दुसरा कारखाना मोहन जगताप यांच्या ताब्यात आहे. उसाचे राजकारण ही या मतदारसंघात महत्वाचा फॅक्टर आहे. दोन्ही कारखाने जोमात सुरू आहेत. या दोन्ही कारखान्याचे चेअरमन भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर उभे राहणार आहेत,. 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा समोरासमोर आलेल्या प्रकाश सोळुंके यांचा पराभव करून मोहनराव जगताप यांचे वडील बाजीराव जगताप विधानभवनात पोहोचले होते. आता या वेळी प्रकाश सोळुंके यांना टक्कर देण्यासाठी पहिल्यांदा बाजीराव जगताप यांचे पुत्र मोहनराव जगताप विधानसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित असल्यामुळे सोळुंके – जगताप यांच्यात पुन्हा लढत पाहण्यास मिळणार आहे. यातूनच या दोघात शाब्दिक खटके उडत आहेत. प्रकाश सोळुंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. तर मोहनराव जगताप सध्या तरी मित्र मंडळाच्या माध्यमातून राजकारण खेळत आहेत. भविष्यात जगताप कोणत्या पक्षात जातात हे उत्सुकतेचा विषय आहे.

प्रकाश सोळुंके यांनी एक महिन्यापासून दुष्काळ पाहणी अभियान सुरू करत गावागावात भेटीगाठींवर भर दिला होता. त्यावर मोहनराव जगताप यांनी सोळुंकेची ही तर नौटंक्की असल्याचे म्हंटले होते. आपल्या ताब्यात असणाऱ्या जिल्हा परिषद गटाची काळजी घ्यावी असा सल्ला मोहन जगताप यांनी दिला होता. यावर प्रकाश सोळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहन जगतापाची औकात काढली. येणाऱ्या निवडणुकीत आपण मोहन जगतापाची काय औकात आहे हे दाखवून देऊ, औकात नसणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, असे ही सोळुंके यांनी म्हंटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मोहन जगताप यांनी पलटवार करत जगतापांची औकात सोळुंकेनी अनुभवली आहे, एकदा विधानसभा आणि एक वेळा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत. हे सर्वश्रुत आहे, सध्या या पेक्षा वेगळे काही सांगणार नाही कारण दुष्काळ भयावह आहे ,पाणी संपले आहे, ऊस उभा आहे, शेतकऱ्याची झोप उडाली आहे. मला या शेतकऱ्याचे बघू द्या, सोळुंके राजकारण करत आहेत ते त्यांना करू द्या. मी निवडणुकीत राजकारणाचे बोलेन, असे मोहन जगताप म्हणाले.

एकंदरीत प्रकाश सोळुंके आणि मोहन जगताप यांच्या राजकीय जुगलबंदीने माजलगाव मतदार संघातील राजकारण शिगेला पोहोचले आहे हे निश्चित.

आपली प्रतिक्रिया द्या