
ऊस लागवडीला तेरा महिन्याचा कालावधी उलटून गेला. अपुऱ्या पाण्यामुळे ऊस वाळू लागला. त्यातच वरून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागली आणि तब्बल चौदा एकर ऊस जळून खाक झाला. जळालेला ऊस पाहून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने टाहो फोडला आहे.
माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील शेतकरी कमलाकरराव गोविंद कुलकर्णी यांचा गट क्र. 372 मधील तब्बल चौदा एकर ऊस विजेच्या तारा घासल्यामुळे जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाचटाने पेट घेतला आणि बघता बघता ऊस जळून खाक झाला.
कमलाकर गोविंद कुलकर्णी, राधाबाई कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी हे कारखान्याचे सभासद आहेत. स्व. सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याकडे त्यांनी रीतसर घटनेची माहिती दिली आहे. जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने तोडण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. जर कारखान्याने ऊस लवकर उचलला नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. या घटनेने कुलकर्णी परिवार हताश झाला आहे.


























































