पुन्हा होतेय सर्वेक्षण, घरोघरी तपासणी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा ‘सेकंड राऊंड’ वेगात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा दुसरा टप्पा सध्या पालिकेच्या माध्यमातून वेगात सुरू असून पालिका कर्मचारी-स्वयंसेवक पुन्हा मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन तपासणी, सर्वेक्षण करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱया या मोहिमेचा दुसरा टप्पा 25 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. दरम्यान, 15 सप्टेंबरपासून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 33 लाखांपेक्षा जास्त घरोघरी जाऊन 1 कोटीपेक्षा जास्त मुंबईकरांची तपासणी-सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची पुन्हा वाढणारी संख्या रोखण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनातून पालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जे लोक घरी नव्हते किंवा ज्यांची तपासणी झाली नाही, पहिल्या सर्वेक्षणातील संशयित, पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण यांच्या प्रकृतीचा आढावा दुसऱया टप्प्यात पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राणवायू तपासणी, शारीरिक तापमानाची तपासणी करण्यात येणार असून लक्षणे असल्यास संबंधित व्यक्तीला पालिका कोविड सेंटर किंवा दवाखान्यात जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मास्क लावा, हात धुवा, सुरक्षित अंतर पाळा!
कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी आणि अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरोधातील हा लढा जिंकण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रिचा अवलंब नियमित केला पाहिजे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पुन्हा एकदा केले आहे. घरी येणाऱया पालिका कर्मचाऱयांना योग्य माहिती द्या, सहकार्य करा असेही ते म्हणाले.