तेलंगणात बस दरीत कोसळून भीषण अपघात, ४५ जण ठार

सामना ऑनलाईन । जगतियाल

तेलंगणातील जगतियालमध्ये मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात ४५ जण मृत्युमुखी पडले आहेत. येथील कोंडागट्टू घाटात तेलंगणाच्या राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

जगतियालच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगाणा राज्य परिवहनच्या या बसमध्ये तब्बल ६२ प्रवासी होते. प्राथमिक अंदाजानुसार बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. बस कोंडागट्टू हनुमान मंदिर ते जगतियाल असा प्रवास करत होती. जिथे अपघात झाला तो रस्ता उताराचा आहे. याच रस्त्यावरून वळण घेताना ब्रेक निकामी झाले आणि बस दरीत कोसळली.

पोलीस आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

summary- major accident in telangana 45 died