लक्ष असू द्या! आजपासून बदलले ‘हे’ नियम; जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू झाले असून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. नव्या आर्थिक वर्षामध्ये काही गोष्टी स्वस्त होणार असून काही महागणार देखील आहे. याचा तुमच्या-आमच्या खिशावर थेट परिणाम होणार असल्याने याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीला काय महागणार हे पाहूया…

घरं महागणार

जमीन खरेदी, खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्क तथा स्टॅम्प डय़ुटी आकारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक मूल्य दर तक्ता अर्थात रेडीरेकनरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात सरासरी 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रासाठी ही वाढ 2.34 टक्के आहे. रेडीरेकनरचे हे नवे दर आजपासून राज्यात लागू होतील. त्यामुळे घरं महागणार आहेत.

वाहन खरेदी महागणार

1 एप्रिलपासून वाहन खरेदी करणे देखील महागणार आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये 2 ते 5 टक्के वाढ केली आहे.

हॉटेलमध्ये जेवण महागणार

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेलवर जेवण करणे महाग होणार आहे. कोरोनाच्या काळापासून अनेक हॉटेल, रेस्टॉरं बंद होते. मालकांनी आपल्या खिशातील पैसे देऊन कर्मचारी वर्गाला जगवले होते. परंतु आता पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळे वाहतूक खर्च आणि गॅसही महागल्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढतील.

क्रिप्टोवर कर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पावेळी क्रिप्टो करन्सीवर कर लावण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. खरेदी आणि विक्रीवर 30 टक्क्यांवर्यंत कर लागणार आहे.

पीएफ खात्यावर कर

आयपासून तुमच्या-आमच्या पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. वर्षाला ज्यांच्या पीएफ खात्यामध्ये अडीच लाखांपर्यंत रक्कम जमा होते त्यांना यातून सूट देण्यात आली आहे, मात्र याहून अधिक रक्कम जमा होणाऱ्यांना कर द्यावा लागणार आहे.

नव्या वर्षातही महागाईचे चटके, पेट्रोल-डिझेलनंतर LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 250 रुपये वाढ

औषधे महागणार

आजपासून डोकेदुखीपासून तापावर वापरली जाणारी अनेक औषधे महागणार आहेत. तब्बल 800 औषधांच्या किंमती 10.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. याच पॅरासिटामोल, फेनोबार्बिटोन, फिनाइटोईन, सोडियम, एजिथ्रोमायसीन यासारख्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे.

आता आपण एक एप्रिलपासून काय स्वस्त होणार ते पाहूया…

सीएनजी-पीएनजी

नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कर अर्थात ‘व्हॅट’मध्ये 10.50 टक्के कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 6 रुपये प्रति किलो तर पीएनजीच्या दरात 3.50 रुपये प्रति एससीएम (घन मीटर) कपात केली आहे.

स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड

सरकारने स्मार्टवॉच उत्पादकांना 31 मार्च 2023 पर्यंत कस्टम ड्युटीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर देशातील स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते.

मौल्यवान रत्न आणि हिऱ्याचे दागिने

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्यूटी 5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मौल्यवान रत्न आणि हिऱ्यांचे दागिने स्वस्त होणार आहेत.

वीज स्वस्त

महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होणार आहेत. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या वीजदराप्रमाणे टाटाच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांच्या वीजदरात 4 टक्के कपात होईल, तर महावितरणचे दर 2 टक्क्यांनी कमी होतील.