
मधुमेह, खोकला, सर्दी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी तुळस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानली जाते. तुळस अँण्टीबॅक्टेरियल आणि अँण्टीऑक्सीडंट गुणांनी समृद्ध आहे. विविध आजारांवर गुणकारी असणाऱ्या तुळशीचा सौंदर्योपचारातही महत्त्वाचा वाटा आहे. त्वचेच्या सौंदर्यात वाढ होण्याकरिताही तुळशीचा वापर केला जातो. त्वचेच्या समस्यांकरिता आयुर्वेदिक औषध म्हणून प्राचीन काळापासून तुळस वापरली जाते. तुळस विषाणूंच्या वाढीला प्रतिबंध करते. चेहऱ्यावरील फोड, मुरुमं, राग, चट्टे, काळे डाग निघून जाण्यासाठी तुळशीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास फायदा होतो. पाहूया तुळशीचे विविध प्रकारचे फेसपॅक बनवण्याच्या पद्धती. यामुळे चेहरा तजेलदार, मुलायम आणि डागविरहित होण्यासाठी नक्कीच मदत होईल.
तुळस आणि कडुलिंब
चेहऱ्यावर मुरुमं, डाग जाण्यासाठी कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा फेसपॅक वापरू शकता. यासाठी तुळस आणि कडुलिंबाच्या पानांची पावडर तयार करा. दोन्ही पावडर सम प्रमाणात एकत्र करा. यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
तुळस आणि दही
मूठभर तुळशीची पाने स्वच्छ धुवा. त्यानंतर ती उन्हात वाळवा. पाने सुकल्यानंतर त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये एक चमचा दही घाला. व्यवस्थित मिसळून घ्या. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
तुळस आणि ओटमील
अर्धा कप ओटमीलची पावडर करून घ्या. यातील एक चमचा पावडर एका भांड्यात काढून घ्या. यामध्ये समप्रमाणात तुळशीची पावडर मिसळा. पाणी घालून हे मिश्रण एकजीव करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा. पेस्ट वाळल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा. तुळस आणि ओटमीलचे मिश्रण असलेला हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा चमकदार, टवटवीत दिसेल. यामुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच वाढ होईल.

























































