थंडीच्या लाटेत अशी घ्या काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैद्य सत्यव्रत नानल

गेल्या काही वर्षांत वातावरणात अकाली बदल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कारणे काहीही असोत, टोकाचे आणि अनपेक्षित असे होणारे वातावरणातील बदल हे आरोग्यासाठी कायम परीक्षा घेणारे असतात. जशी सध्या पडलेली थंडीची लाट. अशा वेळी स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय करावे हे माहीत असणे अत्यावश्यक ठरते. नाहीतर छोटय़ा छोटय़ा त्रासांपासून ते जीव जाण्यापर्यंत अनेक गोष्टी अचानक घडतात आणि काळ सोकावतो.

थंडीत होणारे त्रास आणि त्यावर उपाय 

अशा वेळी पोटात खूप किंवा सतत गॅसेस बनतात, सुटतातही. अन्न गरम गरम झाले, दिवसभर कोमट पाणी प्यायले, रात्री लवकर झोपले तर हे टाळता येते.

कोरडा खोकला, तोसुद्धा रात्री लागतो. दालचिनी एक चिमूट, आले रस अर्धा चमचा, मध एक चमचा असे मिश्रण करून रात्री झोपण्यापूर्वी थेंब थेंब चघळावे. असे रोज दोन ते तीन वेळा करावे. छातीत आणि पाठीत राईचे तेल लावून शेक द्यावा. खोकला कमी होतो.

पोट साफ होत नसेल तर रात्री झोपताना एरंडेल एक ते चार किंवा सहा चमचेपर्यंत आपल्या गरजेनुसार घ्यावे. त्यावर थोडे कोमट पाणी प्यावे. प्रमाण ठरवता येत नसेल तर आपल्या वैद्याचा सल्ला घ्यावा. फक्त एरंडेल घ्यायला नको वाटत असेल तर कोमट दुधात किंवा पाण्यात एरंडेल, तूप आणि गूळ मिसळून ते प्यावे. पोट चांगले साफ होते.

सध्या विनाकारण जुलाब होण्याचे प्रकार सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. अशा वेळी दिवसातून एक-दोनवेळा एक कप ब्लॅक कॉफीमध्ये जायफळ पूड अर्धा ते एक चमचा, सुंठ पाव ते अर्धा चमचा आणि साखर गरजेप्रमाणे मिसळून घ्यावे. याने जुलाब कमी होण्यास फायदा होतो.

थंडीत आंघोळ कोमट ते गरम पाण्याने करावी. दिवसभर थोडे थोडे गरम किंवा कोमट पाणीच प्यावे. रोज आंघोळीपूर्वी थोडे तिळाचे तेल आणि एरंडेल एकत्र करून कोमट करावे आणि सर्वांगास स्वतःच चोळून जिरवावे.

तिळाचे तेल, मोहरी/राईचे तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल यांपैकी तेल प्रकार आणि सोबत थोडे गरम मसाले वापरून अन्न शिजवावे, ज्याने शरीरातही गरमपणा टिकतो.

मसाल्यांमध्ये लसूण, आले, दालचिनी, लवंग, तेजपत्ता (तमालपत्र), काळी मिरी, ओवा, हिंग, जिरे, कसुरी मेथी, मेथी दाणे, कांदापात, लसूणपात, पुदिना हे प्रकार वापरावेत.

ओली ताजी हळद, ताजा आवळा, आले एकत्र किसून त्यात ओवा, जिरे, कोथिंबीर, सैंधव घालून जेवणासह रोज खावे. अपचन होणे टळते. वजन फार वाढत नाही, शरीर हलके राहते आणि उत्साह टिकतो.

थंडीमध्ये अन्न ताजे आणि गरमागरमच जेवावे.

चहामध्ये चहा मसाला, आले, काळी मिरी, दालचिनी असे पदार्थ घालावेत. दूध घालून चहापत्ती उकळू नये. दूध वेगळे गरम करून गाळलेल्या चहामध्ये घालावे. मलईवाला चहासुद्धा बनवताना दुधाची मलई वरून चहामध्ये घालावी. मलई घालून चहा उकळू नये. मलईमुळे शरीरात थंडी सहन करण्याची शक्ती येते. कोरडेपणाही कमी होतो.

साय, लोणी, तूप खावे. दुधाच्या मिठाया खाव्यात. दही, ताक घेऊ नये.

चांगले गोड चीज मिळाले तर उत्तम. नाहीतर साधे चीजसुद्धा अशा थंडीत थोडेसे सकाळी नाश्त्यामध्ये थोडा मध आणि काळी मिरी घालून खावे. रात्री झोपताना जास्त प्रमाणात खाऊ नये.

मांसाहार करावा, ज्याने अंगात उष्णता वाढते. यात गावठी कोंबडी, बोकड हे प्रकार उत्तम. पाया/कपुरा/लिव्हर/भेजा/वजरी/रक्ती असे अनेक प्रकार या दिवसांत खाल्ले तर फायदा होतो.

डिंक मेथी लाडू, हळीव लाडू आणि गरम दुधात तूप घालून पिणे अशा थंडीत उत्तम. हे लाडू पारंपरिक पद्धतीने भरपूर तेलात बनवलेले असावेत. कोरडे, कमी तेलातील लाडू खाऊ नयेत. सोबत कोमट दूध, तूप अत्यावश्यक आहे.