
मालाड येथील एका हॉटेलमधून बांगूरनगर पोलिसांनी सुमारे 39 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांप्रकरणी तरुण कचवाला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. या गुह्यात दोन नायजेरियन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तरुण हा सोने व्यावसायिक असून त्याचे मालाड येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी तरुणची दोन नायजेरियनसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर दोन नायजेरियननी आपल्याकडे कोटय़वधी अमेरिकन डॉलर आहेत. त्या डॉलरवर शाई लागली आहे. ती शाई हिंदुस्थानात चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने निघेल अशा भूलथापा मारल्या. डॉलरवर असलेली शाई निघाल्यास एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम आणि त्या डॉलरवर चिकटवलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटादेखील स्वतŠकडेच ठेव असे तरुणला सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून तरुणने लालचेपोटी सौदा
मान्य केला.
गेल्या आठवडय़ात तरुणने दोन नायजेरियनसाठी मालाड आणि गोरेगाव येथे हॉटेल बुक केले होते. कोटय़वधी रुपयांच्या डॉलरवर चिकटवण्यासाठी 2 हजार रुपयांच्या नोटेची गरज होती. त्यामुळे तरुणने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या कलर प्रिंटआऊट मारल्या. त्या कलर प्रिंटआऊट मारलेल्या नोटा त्या दोघांकडे दिल्या. त्या दोघांनी त्या नोटा पाहिल्यावर त्यांना संशय आला. संशय येताच ते हॉटेलमधून अचानक निघून गेले. त्यानंतर हॉटेलच्या मालकाने तरुणला फोन करून त्या दोघांबाबत विचारणा केली. तेव्हा तरुणने ते दोघे निघून गेले असून हॉटेलमधून चेकआऊट करण्यास सांगितले. चेक केल्यावर त्या रूममध्ये कर्मचारी सफाई करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तेथे एक बॅग दिसली. त्या बॅगेत नोटा असल्याने कर्मचाऱयाने त्याची हॉटेलच्या मॅनेजरला माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरने तरुणला फोन करून त्या बॅगेत नोटा असल्याचे सांगितले. नोटांबाबत मॅनेजरने बांगूरनगर पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी ती नोटांची बॅग जप्त केली. बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी तरुण आणि दोन नायजेरियनांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून तरुणला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली.



























































