Malad wall collapse : आईच्या कुशीतच दीड वर्षाच्या छकुल्याला नेले स्मशानभूमीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मालाड-पिंपरीपाडय़ातील भिंत दुर्घटनेत संपूर्ण ननावरे कुटुंब गाडले गेले. कुटुंबातील दीड वर्षाच्या परशुरामवरही नियतीने आघात केला. तीन बहिणींनंतर 12 वर्षांनी जन्मलेल्या या छकुल्याला आईच्या स्ट्रेचरवरूनच स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास करावा लागला. आईच्या कुशीतील छकुल्याचा मृतदेह पाहून सर्वांचेच मन सुन्न झाले होते.

सोमवारी मध्यरात्री 12.25 च्या सुमारास ननावरे कुटुंब नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. मात्र 26 जुलैच्या पुरातदेखील घराला काही धक्का लागला नव्हता. त्यामुळे ननावरे कुटुंब निर्धास्त होते. परंतु नियतीने थेट पावसाच्या माध्यमातून आघात न करता भिंतीचा ढिगारा कुटुंबावर लोटला. भिंत कोसळताच त्या पलीकडे असलेल्या राष्ट्रीय उद्यानातील पाण्याचा लोट घरात घुसला. यात दीड वर्षाचा परशुराम गटारातून वाहून गेला. 200 फुटांवर गटाराच्या जाळीत त्याचा मृतदेह अडकल्याचे बचाव करणाऱया नागरिकांना आढळून आले. नंतर ढिगाऱयाखालून लक्ष्मण (तात्या) ननावरे (50), राणी ननावरे (42) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. राणी ही ढिगाऱयाखालूनच मदतीसाठी याचना करीत होती. मात्र भल्यामोठय़ा भिंतीचा ढिगारा स्थानिक नागरिकांना क्रेन, जेसीबीच्या मदतीशिवाय बाजूला करणे शक्य नव्हते. आपत्कालीन यंत्रणांनी नंतर घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, परंतु कित्येक तास ढिगाऱयाखाली अडकलेल्या राणीचा प्राण वाचू शकला नाही. तीन मुलींनंतर मुलगा व्हावा म्हणून तिने नवस केला होता, मात्र नवसाच्याच मुलासोबत स्वर्ग गाठण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर आली.