
कारला मागून डम्परने धडक दिल्याने मलकापूर-कराड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी नजीक शनिवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पोळ कुटुंबीय सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा अपघात घडला.
व्यावसायिक अधिकाराव पोळ (49), त्यांची आई गीताबाई (70) पत्नी सुषमा (42), भावजय सरिता सुभाष पोळ (35) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात अधिकराव पोळ यांची पुतणी थोडक्यात बचावली. कारमध्ये पाच जण बसले होते. गाताडवाडी येथे समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ यांनीही कारचा ब्रेक दाबला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली. यातच चौघांचा मृत्यू झाला. मागील वाहनाची जोरात धडक बसल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

































































