
मुंबईत साथीच्या आजारांनी ठाण मांडले असताना रेल्वे हद्दीमध्येही मलेरिया पसरवणाऱ्या ऍनोफिलीस दबा धरून बसल्याचे समोर आले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या दादर, माटुंगा, माहीम आणि मध्य रेल्वेच्या शीव स्थानकासह नऊ ठिकाणी ऍनोफिलीस डासाच्या अळय़ा सापडल्या आहेत. या ठिकाणी पालिकेकडून डास नियंत्रणासाठी धूम्र फवारणी करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत 13 ऑगस्टपर्यंत मलेरियाचे 462, डेंग्यू-317, लेप्टो-151, गॅस्ट्रोचे-429 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या सात दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ या साथीच्या आजारांमध्ये 100 ते 150 ने वाढ झाली आहे. यातच आता रेल्वे हद्दीत ही विविध साथीच्या आजारांचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जी उत्तर विभागाने डासांच्या अळय़ांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत दादर, माहीम, माटुंगा व शीव स्थानकातील छतावर 9 ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या अळय़ा सापडल्या आहेत. डासांच्या अळय़ांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून औषध फवारणी सुरू असल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.
नागरिकांनी काळजी घ्यावी
पावसाळी आजारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अशी होतेय कार्यवाही
पावसाळी आजारांचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने डासांच्या अळय़ांचा शोध घेत कीटकनाशक फवारणीची मोहीम सुरू केली आहे. इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लॅस्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डासाच्या अळय़ा आढळून आल्यास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत.

























































