मालवण- चोरट्यांचा रोख रक्कम व दागिन्यांवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणार्‍या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आत प्रवेश करत कपाट फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी पोलिस ठाण्यात दिली असून तीन संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घराचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोस्ट कार्यालयानजीक राहणारे प्रसाद सावंत हे न्यायालयाच्या कामानिमित्त 23 तारखेला मुंबईला गेले होते. ते माघारी परतल्यानंतर त्यांनी घराचे कुलूप उघडले असता अज्ञातांनी घराची कौले काढून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता दगडाने कपाट फोडून आतील लक्ष्मीपूजनाची गेली पंधरा वर्षे साठविलेली 31 हजार 500 रुपयांची रक्कम, 18 ग्रॅमची सोन्याची साखळी, साडे सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी तसेच अन्य कागदपत्रे चोरीस गेल्याचे दिसून आले.

त्यानुसार त्यांनी आज येथील पोलीस ठाण्यात याबाबत चोरीची तक्रार दिली आहे. यात त्यांनी तीन जणांवर चोरीचा संशय व्यक्त केला असून त्यांची नावेही पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.