अभिनेत्रीकडून नकली नोटांची छपाई, आई व बहिणीसह अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्लम

केरळमधील टीव्ही अभिनेत्री सूर्या शिशकुमार, तिची आई आणि बहिणीला नकली नोटांची छपाई केल्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पासून घरात नकली नोटा छापण्यात येत होत्या अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सूर्या शिशकुमार हिच्या घरी नकली नोटांची छपाई केली जात होती. भूतकाळामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अभिनेत्रीने नकली नोटा छापण्याचा मार्ग निवडला होता. यामध्ये तिची आई आणि बहीणही तिला मदत करत होती. पोलिसांनी बुधवारी या तिघींनी अटक केली. पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरातून नकली नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणात गुरुवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. नकली नोटांच्या छपाई प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता आठ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“अभिनेत्रीच्या घरातून दोन लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नकली नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद, प्रिंटर्स आणि नकली नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे इतर सामना जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या सामानापासून ५० लाखांच्या नकली नोटांची छपाई करण्यात आली असती’, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.