
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यात साक्षीदार फितूर होण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी आणखी एका साक्षीदाराला विशेष एनआयए न्यायालयाने फितूर घोषित केले. त्यामुळे या खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या 37 वर गेली आहे. लागोपाठ साक्षीदार फितूर होऊ लागल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्पह्ट होऊन 6 ठार, तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी सध्या एनआयएचे विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यापुढे नियमित सुनावणी सुरू आहे. बुधवारी फितूर झालेला साक्षीदार हा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना व्यक्तिशः ओळखत होता. त्याने साध्वी यांच्या विविध समारंभांना हजेरी लावली होती, असा तपास यंत्रणेने केला होता.
तथापि, न्यायालयात साक्ष तपासताना त्याने आपण साध्वी यांना ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच एटीएससमोर स्वेच्छेने जबाब दिला नव्हता, असेही नमूद केले. त्यावर न्यायालयाने संबंधित साक्षीदाराला फितूर घोषित केले. सुरुवातीला एटीएसने या बॉम्बस्पह्टाचा तपास केला. त्यानंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. या खटल्यात चारशेहून अधिक साक्षीदारांची यादी देण्यात आली आहे. आतापर्यंत 300 हून अधिक साक्षीदार तपासले आहेत.






























































