
>> मलिका अमरशेख
परदेशात अत्यंत भक्य कल्पक भित्तिशिल्पं, मूर्तिशिल्प आपण पाहतो. ऑप्टिकल इल्युजन मानल्या जाणाऱया या कलाकृतींना निश्चितच दाद द्यायला हकी. आपल्या कला संस्कृतीने क्यापलेल्या एका कालखंडातील कलाकृतीही आपल्याला अशाच भाराकून टाकतात. पण या झाल्या भूतकाळातील प्रतिभा. कर्तमानातही अशा कलाकृती आपल्या शहराची, देशाची ओळख बनायला हक्यात असं काटणं स्काभाकिक आहे. पण आपल्या शहराची ओळख आता बदलत चाललीय हे आपणच जाणलं पाहिजे.
नको नको तोडू झाडा
धरणीमाता फोडते हंबरडा!
बरोब्बर ओळखलंत!
पुणेरी भिंतवाचिका ।
पुणेरी पाटय़ांवर, माणसांवर अनेक अद्भुत आख्यायिका, विनोद आहेत. पण जाऊद्या, त्यावर चर्चित चर्वण करायला आपण कुठे पुणेकर आहोत? तर मुद्दा आहे तो शहराच्या भिंती-इमारती-बागा कल्पक, देखण्या कशा बनवायच्या! त्यांना मुखवटे कसे द्यायचे की जेणेकरून आपल्या प्रतिभेचं दर्शन, चेहरा दिसेल. खोटा मुखवटा नाही!
परदेशात – जगभरातच अत्यंत भव्य कल्पक मूर्ती भित्तीशिल्प चित्रं दिसतात. इतकी की दादच द्यावी थबकून. स्त्री…भव्य चेहरा, तिच्या केसांतून पाणी गळतंय… कारंजाच्या पाण्याची ही कल्पकता! नंतर मोडक्या पाइपवर दुःखी चेहरा रंगवलेला… कुठे ब्राँझची शिल्पं-जमिनीतून वर येतात. माणूस पाण्यात उभारलेला, स्विमिंग करणाऱया बाईचा चेहरा, तारेतून उभारलेल्या मूर्ती… ब्राँझचा बॅग घेतलेला, पण पोटाचा भाग नसलेला माणूस- ऑप्टिकल इल्युजन (भ्रामक प्रतिमा) असणाऱया चित्रकृती! हातालाच चेहरा असलेला हात, तुटलेल्या भिंतीलाच कॅन्व्हॉसकरवी त्यातून बाहेर येणारं माणसाचं चित्र! झाडाच्या भोवती जमिनीतून वर येणारा हात… ही काही मोजकी उदाहरणं. मग आपल्याकडली कल्पकता कुठे गेली? शिल्पकार, चित्रकार कुठं गायब झाले? तंत्रज्ञान-विकास आणि पोट भरणं एवढय़ाच गोष्टी हिंदुस्थानींसाठी कशा काय उरल्या? अजिंठा, वेरूळ, खजुराहो… इथली लेणी… ताजमहाल… विविध शिल्पांनी नटलेली हेमाडपंथी मंदिरं – हंपी – कोणार्कचं सूर्यमंदिर … ही भूतकाळातली प्रतिभा… पण आजचं काय? सेल्फी काढून पोस्ट करण्यासाठीच आपला जन्म अन् मरण पण?
नाही म्हणायला वांद्रय़ाच्या भल्यामोठय़ा इमारतीवर रंगवलेलं दादासाहेब फाळकेंचं चित्र…, ‘दिवार’मधला अमिताभ अन् जोगेश्वरी-बोरिवलीच्या नजिक लांबलचक भिंतीवर रंगवलेली मुंबई… या पलीकडे काही नाही…
मुंबईला आर्थिक, कला, नाटय़ या विविध संस्कृतींची व्यापक व श्रीमंत पार्श्वभूमी आहे. तेवढीच टोकाची उच्चभ्रू श्रीमंती व झोपडीत, चिखल-दलदलीत, खोपटय़ात, पत्र्याच्या टपरीवर आयुष्य जगणाऱया गरीब मजुरांची वस्ती तसेच तिन्ही बाजूला असीम विशाल समुद्राची घनगर्द गाज… अन् त्या लाटांच्या फेसाळत्या कवेत मुंबईचे किनारे विसावलेले… इतकी लोभस रमणीय पार्श्वभूमी असताना त्या वाळूवर-लांबचलांब किनाऱयांवर आहे काय? तर निर्माल्य कलश! टॉयलेट…! खाद्यपदार्थांच्या गाडय़ा… अन् मजा करायला आलेले तरुण-तरुणींचे जथे! वाळूची शिल्पं नाहीत… शंख-शिंपले गोळा करणाऱया लहान मुलीची मूर्ती नाही… समुद्रातून विशालकाय व्हेल मासा उडून किनाऱयावर येऊ पाहणारा नाही. समुद्रकिनाऱयावर एकमेकांच्या कुशीत विसावलेले प्रेमळ जोडपं… त्यांना बघणारा आपलं तरुणपण आठवत बसलेला वृद्ध माणूस… कितीतरी सुंदर चित्रशिल्प कल्पना त्या मुंबईच्या किनाऱयावर रेखाटता येतील! पण अजूनही कल्पना दारिद्रय़ातच आहोत!
मलबार हिलचा रस्ता किती निवांत, रमणीय. फक्त तिथं एकच चांगली कल्पना राबवलेली… झाडांना वेगवेगळे आकार देऊन!
राणीचा बाग… संजय गांधी उद्यान इथं कितीतरी सुंदर कल्पना राबवता येतील. डिस्नेलँडसारखा हलणारा डायनोसॉर – धावणाऱया मगरी… भिंतीतून… ती तोडून बाहेर येऊ पाहणारा हत्ती. नदीवर चक्क मोठाल्या हंसाची प्रतिकृती असलेली नाव – ज्याच्या पाठीवर तुम्ही बसाल… तर नदीखाली एक टनेल – ज्यातून चालत तुम्ही पाण्याखालची सृष्टी पाहू शकाल!
मुंबईला लाभलेल्या भौगोलिक वातावरणाचा आपण फायदा सोडाच, तोटाच करतोय… ‘डायमंड नेकलेस’ हे नामाभिधान आपण मुंबईच्या रात्रीच्या दिमाखदार झळझळीत चंद्रहाराच्या सौंदर्यासाठी वापरतो, पण त्यासाठी काही आपण केलेलं नाहीय-भौगोलिक पट्टय़ामुळं, वाहनांमुळं अन् रस्त्यावर असलेल्या लाइटसमुळे ती सुंदर दिसते! यात कसली आलीय कल्पकता?
… अगदी हल्लीच चर्चगेट स्टेशनबाहेर गाय, सिंह, वाघाचे पुतळे उभारलेत… पण तिथून जरा पुढे गेल्यावर सीएसएमटी स्टेशनच्या इमारतीकडे निरखून पाहय़लंत तर त्यावर झेप घेणारे कुत्रे, लांडगे, वाघ हे जास्त सुंदर आणि कल्पक आहेत!
समुद्र आणि पाऊस हे मुंबईचं व्यवच्छेदक लक्षण!
अन् पावसात मुंबईची तुंबई झालेली तीही भित्तीचित्र काढायला हरकत नाही!
बोटीतून कामावर जाणारा मुंबईकर! कॉम्प्युटरच्या प्रचंड फ्रेममधून यांत्रिक हातानं खेचून आत घेतलेला मुंबईकर, मदतीला धावणारा मुंबईकर अशी अनेक विशाल रंगीत भित्तीचित्रं इमारतींवर वा भिंतींवर काढता येतील.
‘धरणीमाता फोडते हंबरडा’-
त्यापेक्षा हे जास्त उचित अन् कल्पक होईल नाही का?



























































