
सामना प्रतिनिधी। मलकापूर(बुलढाणा)
बसस्थानकावर मोफत पास काढण्याच्या काऊंटरवर लाईनमध्ये मागेपुढे होण्याचे कारणावरून झालेल्या विद्यार्थ्यांच्या भांडणात एकाने दुसर्याच्या पोटात चाकू मारल्याची धक्कादायक घटना मलकापूर येथे घडली.
शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत पास योजना सुरू केल्याने पास काऊंटरवर एकच गर्दी झाली आहे. आज दुपारी पास काढण्यासाठी नंबर लावलेल्या लाईनमध्ये मागेपुढे झाल्याचे कारणावरून वरखेड ता. मलकापुर येथील कुणाल किसन वानखेडे (18) व टाकरखेड ता.मोताळा येथील महेश गणेश जाधव (18) यांच्यात लाईनमध्ये मागेपुढे उभे राहण्यावरुन बोलचाल झाली. महेश जाधव याने बॅगमधील चाकु काढून कुणाल वानखेडे याच्या पोटात मारल्याने तो जखमी झाला. त्यास प्राथमिक उपचारार्थ डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कुणाल वानखेडे रा.वरखेड याने दिलेल्या तक्रारी वरुन महेश गणेश जाधव याचेविरुध्द कलम 326, 504 भादवि नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.उप.नि.शुभांगी पाटील करीत आहे.


































































