टिकल ते पॉलिटिकल – रेल्वे खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव

708

देशातील रेल्वे स्थानके व ट्रेनच्या खासगीकरणाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. खासगीकरण करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आदेश म्हणजे जनतेचा विश्वासघात असून हिंदुस्थानची रेल्वे खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. दिल्ली ते लखनौ अशी देशातील पहिली खासगी ट्रेन चालू केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने 50 रेल्वे स्थानके आणि 150 ट्रेनच्या खासगीकरणासाठी एक समिती स्थापन केली आहे.

यासंदर्भात भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला जाहीर आश्वासन दिले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही. रेल्वेवर त्यांचे अतिशय प्रेम असून बालपणीपासून आपला रेल्वेशी संबंध राहिला आहे. ‘नीती’ आयोगाने घेतलेला निर्णय हा मोदींनी जनतेला दिलेल्या वचनाचा भंग आहे. भारतीय रेल्वे ही गोरगरीबांच्या रोजगाराशी आणि उपजीविकेशी जोडलेली जीवनवाहिनी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागांना, गोरगरीब वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम रेल्वे करते. रेल्वे गरीब जनतेचे दळणवळणाचे हक्काचे साधन आहे. हेच साधन खासगी उद्योजकांच्या घशात घालून जनसामान्यांचा हक्क काढून घेण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे, असा आरोप करतानाचा खरगे यांनी या खासगीकरणाला पक्षाच्या वतीने निषेध आणि विरोध दर्शवला.

आपली प्रतिक्रिया द्या