मालवणात कचऱ्याचे साम्राज्य

सामना प्रतिनिधी। मालवण

नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात नागरिकांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यामुळे केंद्र शासनाच्यावतीने ५ कोटीचे बक्षीसही जाहीर झाले. मात्र मालवणात स्वच्छ सर्वेक्षणनंतरही कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातील अनेक भागात कचरा उचलण्यासाठी गाडी येतच नसल्याने सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, ही कचराकोंडी फोडण्यासाठी काही नागरिकांनी कचऱ्याच्या साचलेल्या ढिगाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच या कचऱा कोंडीतून नागरिकांची सुटका करावी असे आवाहनही नागरिकांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने मालवणात गेल्या वर्षीपासून स्वच्छतेला प्राधान्यक्रम दिला गेला. परिसर स्वच्छ ठेवण्यापासून ओला, सुका कचरा वर्गीकरण करण्यापर्यंत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचे पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. मात्र स्वच्छ सर्व्हेक्षणानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या डोके वर काढताना दिसत आहे. अनेक प्रभागात कचरा गाडी येत नाही, वेळच्यावेळी कचरा उचलला जात नाही, अशी ओरड शहरवासीयांमधून ऐकायला मिळत आहे.

सर्वसामान्य रुग्णांची आरोग्यवाहिनी असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस पालिका प्रशासनाच्या जागेतच कचऱ्याचे ढीग गेले चार दिवसांपासून उचलले गेले नाहीत. त्यामुळे डासांची समस्याही वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेची गाडीच येत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, त्या ठिकाणी पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करत असलेली विहिर असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.