
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरातील कचऱ्याचा उठाव मोठ्या प्रमाणात होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषद व आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे. गेल्या महिन्यात पहिल्या टप्प्यात पाच घंटा गाड्यांतून कचऱ्याचा उठाव सुरू केला. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २० ढकल घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांकडून थेट घराघरातील चारही प्रकारचा कचरा गोळा केला जाणार आहे.
दरम्यान, ढकल घंटागाड्यांचा शुभारंभ येत्या दोन दिवसांत केला जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती आपा लुडबे यांनी दिली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान सुरु केल्यानंतर महाराष्ट्र शासनानेही राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सुरुवात केली. सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र उपक्रमास मालवण नगरपरिषदेने नागरिकांच्या पाठिंब्यावर आणि सहकार्यावर शहरात स्वच्छता अभियान सुरु केले. हे करत असताना ‘कचरा लाखमोलाचा’ ही संकल्पनाही राबविण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ‘ओला कचरा, सुका कचरा, घातक वस्तुंचा कचरा, सॅनिटरी नॅपकिन कचरा’ अशा प्रकारे कचऱ्याच्या चार प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
मालवण नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात गुणात्मकदृष्ट्या गतवर्षी चांगले यश पटकावल्यानंतर यावर्षीही स्वच्छता अभियानात अधिक चांगल्या प्रकारे यश मिळवावे. आणि हे यश मिळविण्यासाठी मालवण नगरपालिकेला नागरिकांनी सक्रिय योगदान द्यावे यासाठी मालवण नगरपरिषदेकडून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. दोन वर्षापुर्वी मालवण शहरातून प्रतिदिन २ टन एवढा कचरा मालवण नगरपरिषदेकडुन गोळा केला जात होता. गेल्या दोन वर्षात प्रतिदिन साडेतीन टन कचरा शहरातून गोळा केला जात आहे. दररोज गोळा होणाऱ्या या कचऱ्याचे नगर परिषद आपल्या स्तरावर चार प्रकारात विभागणी करत असून त्यासाठी सहा स्वच्छता दूतांची नियुक्ती केली गेली आहे. मालवण नगरपरिषदेने शहरातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी कायस्वरूपी स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच ठेकेदारी पद्धतीतून ३६ कर्मचारी याकामी सेवेत घेतले आहेत. असे स्पष्ट करीत लुडबे यांनी म्हटले आहे की गेल्या महिन्यापासून मालवण शहरातील आठ प्रभागातील कचऱ्याचा उठाव पाच घंटा गाड्यांमार्फत केला जात होता. याला नगराध्यक्षांसह प्रभागातील नगरसेवकांनी आणि नागरिकांनी चांगले सहकार्य केले. आता स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात २० ढकल घंटागाड्या खरेदी केल्या असून या ढकल घंटा गाड्यांतून घराघरातून कचरा गोळा केला जाणार आहे.
सकाळी सात वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी शहराचे १४ विभाग करण्यात आले आहेत. त्यात धुरीवाडा तीन भाग, रेवतळे तीन भाग, मेढा दोन भाग, देऊळवाडा आडवण दोन भाग, वायरी दांडी तीन आणि बाजारपेठेचा एक भाग अशी विभागणी करण्यात आली आहे. यासाठी एक ढकल घंटा गाडी आणि दोन स्वच्छता दूत अशा चौदा गाड्या आणि १४ स्वच्छता दूतांमार्फत स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. या १४ विभागांसाठी ४ घंटा गाड्या आणि प्रत्येक घंटा गाडीवर प्रत्येकी २ स्वच्छता दूत तैनात ठेवण्यात आले आहेत.
किनारपट्टीही होणार स्वच्छ
घरातील कचरा उचल करताना किनारा स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील मोरेश्वर ते दांडेश्वर समुद्र किनारा, दांडेश्वर ते मालवण बंदर जेटी किनारा आणि बंदरजेटी ते राजकोट किनारा व चौकचार ते कुरण धुरीवाडा अशी किनारपट्टीच्या चार भागांची विभागणी करण्यात आली आहे. यासाठी एक घंटागाडी आणि एक स्वच्छता दूत कार्यरत राहणार आहे. तसेच प्रमुख रस्त्यावरील कचरा कुंड्यांमधील कचऱ्याच्या उठावासाठी एका घंटागाडीचा वापर केला जाणार आहे.
गांडूळ खत व कचऱ्याचे रिसायकलिंग
मालवण शहरात दरवर्षी सुमारे १० ते १५ लाख पर्यटक येतात. पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्याच्या उठावासाठीही नगरपरिषदेने उपाययोजना केली आहे. विभागणी करून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यामधून गांडूळ खत बनविणे, कचऱ्याचे रिसायकलिंग करणे अशा गोष्टी नगरपरिषदेने हाती घेतल्या आहेत. कचऱ्याच्या रिसायकलिंगसाठी श्रेडिंग मशीनची खरेदीही करण्यात येणार आहे.






























































