
देवबाग येथे बोटिंग व वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकात एक खिडकी नियोजनावरून वादाची ठिणगी पडली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकात वाद भडकला असताना दुसरीकडे बंदर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मालवण बंदर किल्ले सिंधुदुर्गनजीक व दांडी येथील 11 स्कुबा व्यवसायिकाचे तब्बल 17 ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहेत. ऐन पर्यटन हंगामात उफळलेल्या वाद व होणारी कारवाई पाहता याचा परिणाम पर्यटन व्यावसायावर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
देवबाग येथील महापुरुष जेटीनजीक बोटिंग व वॉटरस्पोर्ट्स एक खिडकी नियोजनावरून झालेल्या वादातून देवानंद परशुराम चिंदरकर यांनी मनोज मोरेश्वर खोबरेकर, राजन धर्माजी कुमठेकर व पंकज गणपत धुरी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तर राजन कुमठेकर यांनी देवानंद चिंदरकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तुम्ही एक खिडकी योजना कसे राबवता ते मी बघतो, अशी धमकी चिंदरकर यांनी दिल्याचे कुमठेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर दांडी येथील सागर धुरी यांनी समीर सारंग, मनोज खोबरेकर, पंकज धुरी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्सुनामी आयलंड येथे वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय प्रकरणी धमकी, शिवीगाळ करून साहित्याची तोडफोड केल्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

































































