ध्यान करताना कॅमेरा कोण नेतो?; मोदींच्या कन्याकुमारी भेटीवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

modi-and-mamata

Lok Sabha Election 2024: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 4 जून रोजी मतदानाच्या निकालापूर्वी ध्यान करण्यासाठी तमिळनाडूमधील कन्याकुमारीला भेट देण्याच्या त्यांच्या आयोजनावरून खिल्ली उडवली. ‘तिथे कोणीही जाऊन ध्यान करू शकतो… ध्यान करताना कोणी कॅमेरा घेऊन जातो का?’, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

त्यांनी पुढे आरोप केला की, ‘…निवडणुकीच्या 48 तास आधी, ध्यानाच्या नावाखाली ते एसी रूममध्ये जाऊन बसतात’.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांना श्रद्धांजली अर्पण केलेले स्मारक विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कन्याकुमारीला भेट देण्याची आपला मानस होता परंतु नंतर त्यांना पंतप्रधानांच्या नियोजित भेटीबद्दल माहिती मिळाली.

‘मला माहित नाही की कोणीही पक्ष काहीही का बोलत नाही. मला वाईट वाटते… स्वामी विवेकानंद तिथे ध्यान करायचे आणि ते (पंतप्रधान) तिथे जाऊन ध्यान करतील’, असं बॅनर्जी म्हणाल्या.

‘परमात्म्यानं त्यांना एका उद्देशानं पाठवलं होतं’ या विधानावरून त्यांनी पीएम मोदींचा समाचार घेतला.

‘जर ते देव असतील तर ते ध्यान का करतील? इतर त्यांचे ध्यान करतील’, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कन्याकुमारी येथील ध्यान टीव्हीवर दाखविल्यास त्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून ते आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन ठरेल असा आरोप केला आहे.