
सामना ऑनलाईन । मुंबई
ममता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे अंधेरी येथे ‘महिला सक्षमीकरण : आर्थिक व सामाजिक’ या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम समाज सेवा केंद्र, साईबाबा नगर, मरोळ पाईप लाईन येथे पार पडला. प्रसिद्ध उद्योजिका आरती कांबळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
आरती कांबळे या आरती ऍग्रो ऍण्ड फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. ही कंपनी ५ हजार पेक्षा जास्त रिटेलर्स आणि मॉडर्न रिटेलर्सना दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा पुरवठा करते. तसेच अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यात जलविद्युत प्रकल्प देखील कार्यरत आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या त्या मुंबई महिला विभागाच्या प्रमुख आहेत. महिला उद्योजिका घडविण्याचे त्यांचे ध्येय आहे.
“महिलांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता सध्या काळाची गरज बनली आहे. महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपले पाउल टाकावे. त्यांनी आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावे,” असे आरती कांबळे यांनी सांगितले.































































