हिंगोलीत भाजपच्या राज्यमंत्री व आमदारांना नागरिकाची शिवीगाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश पाटील। हिंगोली

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रदीप वानरे या नागरिकाने भाजपाचे राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना शिवीगाळ करत चांगलाच गोंधळ घातला. तसेच पोलिसांनादेखील शिवीगाळ केली. माझे निवेदन घ्या अशी जोरजोराने आरडाओरड करत असतानाच प्रदीप वानरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भाजपचे नेते व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे रविवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक संपल्यावर सायंकाळी पावणे पाच ते पाच वाजेच्या दरम्यान पालकमंत्री कांबळे, हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह विश्रामगृहाकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस, भाजपा कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री व आमदार वाहनात बसल्यावर हिंगोलीच्या रिसालानाका भागातील श्रीनगरमधील रहिवासी प्रदीप सखाराम वानरे हे वाहना जवळ येऊन पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत होते. निवेदन देत असतानाच वानरे यांनी आरडाओरड सुरू केली. त्यावेळी बंदोबस्तासाठी हजर असलेले हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी वानरे यांना बाजूला घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वानरे यांनी जोरजोरात शिवीगाळ करत चांगलाच गोंधळ घातला.

त्यामुळे पोलीस जीपमधून वानरे यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पोलीस कर्मचारी शेख शकील शेख रतन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप वानरे याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये पालकमंत्री, आमदार तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे पालकमंत्री व आमदार तसेच भाजपा सरकार विषयी जनतेच्या मनात असलेला रोष यामुळे पुढे आल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. दरम्यान प्रदीप वानरे हा मद्य प्राशन केलेला होता आणि त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक चंदेल यांनी सांगितले आहे.