बायकोला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या मेव्हण्याचा केला खून, दांपत्यासह चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायकोला अश्लिल मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या चुलत मेव्हण्याचा खून करणाऱ्या आरोपीसह चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासात अटक केली. अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ उपस्थित होते.

तुषार दिलीप मेटकरी (वय 33 रा. केशवनगर), विनोद विष्णु दुपारगुडे (वय 34 रा. वडगाव धायरी,) किरण अंकुश चौधरी (वय 43 रा. नांदेड फाटा) आशा तुषार मेटकरी (वय 32 रा. केशवनगर मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महादेव गणपती दुपारगुडे असे खून केलेल्याचे नाव आहे.

जांभुळवाडी परिसरात 19 ऑगस्टला तरूणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासासाठी तीन पथके रवाना केली. दरम्यान, व्हॉटसअ‍ॅप फोटो पाहून विजय दुपारगुडे यांनी पोलिस ठाणे गाठून खून झालेल्या व्यक्ती महादेव भाऊ असल्याची माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, रविंद्र चिप्पा यांनी तुषारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चुलत मेव्हणा महादेव हा पत्नी आशाला अश्लिल मेसेज करीत होता. वेळोवेळी तिला प्रेमाचे मेसेज पाठवून त्रास देत होता. त्यामुळे 19 ऑगस्टला त्याला फोन करून धायरी परिसरात बोलावून घेतले. त्या ठिकाणी दोन चुलत मेव्हण्यांसह पत्नीच्या साथीने त्याला पट्टयाने मारहाण केली.

महादेवला रिक्षातून जांभुळवाडी परिसरात सोडून दिले. याप्रकरणी अमंलदार अवधुत जमदाडे, विक्रम सावंत आणि गणेश भोसले यांनी इतर आरोपी विनोद, किरण यांना ताब्यात घेतले. त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षव जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, उपनिरीक्षक गौरव देव, उपनिरीक्षक अंकुश कर्चे, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, अभिजित जाधव, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, तुळशीराम टेभुर्णे, रविंद्र भोरडे, राहुल शेडगे यांनी केली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.

नात्यातील लग्न झालेल्या महिलेला सातत्याने अश्लिल मेसेज केल्यामुळे आरोपींनी संबंधिताला घरी बोलावून घेतले. त्याठिकाणी बेदम मारहाण करून रिक्षातून जांभुळवाडी परिसरात सोडून दिले. या प्रकरणी भारती विद्यापीठ तपास पथकाने 48 तासात आरोपींना अटक केली.
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त