
सामना ऑनलाईन । मेरठ
पोलीस भरतीसाठी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी अत्यंत कडक नियम असतात. पोलीस भरतीसाठी ठरवून दिलेल्या उंचीपेक्षा उंची एक सेमीपेक्षाही कमी असेल तरी लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवाराला नाकारलं जातं. त्यामुळे उमेदवार देखील त्यांची निवड व्हावी म्हणून काहीही करायला तयार असतात. हाच प्रकार एका उमेदवाराच्या अंगाशी आला असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या उमेदवाराने त्याची उंची वाढविण्यासाठी चक्क डोक्यावर मेहंदी थापून ठेवली होती.
पोलीस भरतीसाठी उमेदवाराची उंची ही १६८ सेंटीमीटर असणे बंधनकारक आहे. बुलंदशहर येथील अंकित कुमार याने देखील पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा दिली होती. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर त्याला शारीरिक चाचणीला सामोरे जायचे होते. मात्र अंकितची उंची ही १६७ सेंटीमीटर असल्याने त्याला माहीत होतं की, शारीरिक चाचणीत तो बाद होणार. त्यामुळे त्याने स्वत:ची उंची वाढविण्यासाठी एक शक्कल लढवली. केसाला लावायच्या मेहंदीचा एक थरच त्याने डोक्यावर थापला व मागच्या बाजूने केस विंचरले. त्यामुळे डोक्यावर एक उंचवटा तयार झाला होता व अंकितची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली. मात्र शारीरिक चाचणीच्या वेळी पोलिसांना अंकितची ही चालाखी लक्षात आली व त्याच्या डोक्यावर थापलेली मेहंदी त्याला काढायला लावली. याबाबत विचारणा केली असता अंकितने त्याची उंची वाढविण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी अंकितला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम ४२० अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अंकितची उंची तपासण्यासाठी आम्ही जेव्हा त्याला मशीनखाली उभे केले त्यावेळी मशीनच्या वरच्या बाजूला काहीतरी काळ्या रंगाचे चिखलासारखे लागले. त्यावरून आम्हाला संशय आला व आम्ही अंकितला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या केसाची तपाासणी केली असता त्याने डोक्यावर भरपूर मेहंदी लावून ठेवल्याचे आमच्या निदर्शनास आले’, अशी माहिती शारीरिक चाचणी विभागाचे प्रमुख संजीव बाजपेयी यांनी सांगितले.






























































