लुटमार करणाऱ्या जादूगर कंपनीचा म्होरक्या गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकटय़ा प्रवाशाला चार-पाच जणांनी हेरून मग त्या प्रवाशाकडील किमती ऐवज शिताफीने चोरून पसार होणाऱ्या जादूगर कंपनीचा म्होरक्या रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या हाती लागला. पोलिसानी त्याच्याकडून दीड लाखाची चोरीची रोकड हस्तगत केली आहे.

घाटकोपर येथे राहणारे शिवाजी शेलार (44) हे 16 ऑगस्ट रोजी मालाड रेल्वे स्थानकात साडेतीन लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी घेऊन चालत होते. त्यावेळी सात ते आठ जणांनी त्यांना हेरून त्यांच्या हातातली पैशांची पिशवी हिसकावून घेतली होती. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सतीश क्षीरसागर, श्रीकृष्ण चव्हाण, विजय ढवळे, सुरेश येला, सतीश फडके, अमित बडेकर, गणेश माने, राजेश कोळसे या पथकाने समांतर तपास सुरू केला. गुन्ह्यातील मुख्य आरोपी कल्याण येथील कृष्णा लॉजमध्ये असल्याची खबर पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा लॉजमध्ये जाऊन तेथे लपून बसलेल्या रौफ हबीब शेख (50) याच्या मुसक्या आवळल्या. रौफ हा प्रवाशांचे किमती ऐवज चोरणाऱया टोळीचा म्होरक्या आहे.