युवतीवर अत्याचार करणाऱयाला भंडाला जिल्ह्यातून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱया आरोपीला नगर तालुका पोलिसांनी नागपूरजवळील किन्ही एकोडी (ता. साकोली जि. भंडारा) येथून अटक करण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा दोन दिवस शोध घेऊन मुसक्या आवळल्या. दिग्रेश दामू बडोले (रा. किन्ही एकोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱया युवतीला दिग्रेश बडोले याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले होते. परंतु, त्याने तिच्यासोबत लग्न न करता तिची फसवणूक केली. त्यामुळे पीडित युवतीने 2 मे रोजी नगर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.

त्यानुसार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक भंडारा जिल्ह्यात पाठवण्यात आले होते. पथकाने आरोपी बडोले याचा मूळ गावी दोन दिवस शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग, कॉन्स्टेबल विशाल टकले, संदीप जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.