भयंकर! दोन दिवसात 25 श्वानांची गोळी मारून हत्या, व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्राणीप्रेमींमध्ये संताप

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यामधून एक भयंकर घटना समोर येत आहे. येथे एका व्यक्तीने 25 हून अधिक कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारले आहे. राजस्थानमधील गावात एक व्यक्ती बंदूक घेऊन फिरतोय. फिरताना त्याला जिथे कुत्रा दिसेल तिथे तो त्याला गोळी मारतो. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना झुंझुनू जिल्ह्यातील कुमावास गावातील आहे. येथे एक माथेफिरू माणूस गावातील भटक्या कुत्र्यांना शोधत फिरतोय. फिरताना एखादा कुत्रा दिसला की, तो त्याच्यावर डबल-बॅरल बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्याही करतोय. ही घटना 2 ते 3 ऑगस्ट दरम्यानची आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माथेफिरू व्यक्तीने आतापर्यंत 25 हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती एका बाईकवर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. हमीरी गावाच्या माजी सरपंच सरोज झझारिया यांनी कुत्र्यांना मारल्याबद्दल पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

पोलिसांना आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी डुमरा येथील रहिवासी शेओचंद बावरिया नावाच्या व्यक्तीने कुत्र्यांना गोळ्या घातल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपींना चौकशी करुन लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.