मित्राला फसवून 100 रुपयाची दारू प्यायला, म्हाताऱ्याने ठार मारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दारु पिण्याच्या वादातून एका 60 वर्षाच्या वृद्धाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टोनी नावाच्या मित्राला दारू आणण्यासाठी 60 वर्षाच्या श्रीधर यल्लामल्लीने 100 रुपये दिले होते. मात्र, टोनीने श्रीधरला फसवत त्याने दिलेल्या पैशातून स्वतः दारू प्यायला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात श्रीधरने तीक्ष्ण लोखंडी रॉडने टोनीला भोसकून त्याची हत्या केली. घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र, त्याच्या हातावर असलेल्या टॅटूचा माग काढत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

श्रीधरने 27 जूनला दारु आणण्यासाठी टोनीला 100 रुपये दिले होते. मात्र, टोनीने श्रीधरला फसवत त्या पैशातून स्वतःच मद्यपान केले. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात श्रीधरने टोनीला तीक्ष्ण लोखंडी रॉडने भोसकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. डंकर रोड जंक्शनच्या फूटपाथवर 28 जूनला पहाटे 5.30 वाजता मृतदेह आढळल्याचा फोन पोलिसांना आला. घटनास्थळी पोहचत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. टोनीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती जमवण्यास सुरुवात केली. टोनीसोबत नेहमी हातावर टॅटू असलेली वृद्ध व्यक्ती नेहमी असायची. ते दोघे एकत्र मद्यापन करायचे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या व्यक्तीच्या हातावर मेनका नावाचा टॅटू असल्याचे पोलिसांना समजले. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी ससून डॉकपासून हातावर मेनका नावाचा टॅटू असणाऱ्या लोकांना शोधत त्यांची चौकशी सुरू केली. सुमारे 150 लोकांची चौकशी करून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र, आम्ही शोधत असलेल्या आरोपीची माहिती मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर जे.जे. मार्ग पोलीस तपास करत माटुंग्याला आले. हातावर मेनका नावाचा टॅटू असलेली एक व्यक्ती माटुंगा रेल्वे यार्डमध्ये झोपायला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी श्रीधर रेल्वे यार्डात झोपायला आला. त्यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपल्याला फसवत टोनीने मद्यपान केल्याचा राग आल्याने त्याची हत्या केल्याचे श्रीधरने सांगितले.