भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याने मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

भडक डोक्याची मंडळी कोणत्या कारणावरून वाद घालतील याचा नेम नाही. बंगळुरू शहरातील कलसीपाल्या न्यू एक्सटेन्शन भागात कुत्र्याला लाथ मारण्यावरून मित्रांमध्ये भांडण पेटलं. या भांडणात एकाचा मृत्यू झाला आहे. एस.नागराज असं मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या मृत्यूला त्याचाच जिगरी मित्र युनूस कारणीभूत ठरला आहे.

मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नागराज आणि युनूस या भागातील भाजी मंडईत उभे होते. हे दोघेजण मालवाहून नेणारी रिक्षा चालवतात. रस्त्याच्या कडेला उभे असताना युनूसने एका कुत्र्याला लाथ मारली. याचा नागराजला राग आला, त्याने युनूसला दम दिला की पुन्हा असं करून नको नाहीतर परिणाम वाईट होतील. यामुळे युनूस भडकला आणि दोघांमध्ये मारामारीला सुरूवात झाली. युनूसने नागराजला कानाखाली मारली आणि तिथून तो पळून गेला, त्याचा पाठलाग करत असताना नागराज एका भरधाव वेगात येत असलेल्या रिक्षावर आदळला. गंभीर जखमी झालेल्या नागराजला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर युनूस फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की त्याच्या दुकानाबाहेरच हा सगळा प्रकार घडला. हा दुकानदार या दोघांनाही चांगलं ओळखत असून नागराज आणि युनूस  हे जवळपास १२ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते असं या दुकानदाराचं म्हणणं आहे.